साडेआठ महिन्यांनंतर पुन्हा दर्शन! धाराशिवच्या डोंगररांगात वाघाची डरकाळी, शेतकरी भयभीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 16:15 IST2025-09-05T16:10:26+5:302025-09-05T16:15:01+5:30
कॅमेरा, रेस्क्यू टीमलाही गुंगारा देणाऱ्या वाघाने पुन्हा एकदा दिली हजेरी! वरवंटी शिवारातील माळावर झाले दर्शन

साडेआठ महिन्यांनंतर पुन्हा दर्शन! धाराशिवच्या डोंगररांगात वाघाची डरकाळी, शेतकरी भयभीत
धाराशिव : तब्बल साडेआठ महिन्यांपासून धाराशिव, सोलापूर अन् अहिल्यानगरच्या सीमेवर आपले बस्तान ठोकलेल्या वाघाने ४ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा दर्शन दिले. धाराशिव शहरालगतच्या डोंगररांगातील वरवंटी शिवारात सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास एका माळावर खुलेआम फिरताना फोडलेल्या डरकाळ्यांनी या भागातील शेतकरी भयभीत झाले आहेत.
यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून मजल-दरमजल करीत धाराशिवच्या रामलिंग अभयारण्यात दाखल झालेला वाघ पहिल्यांदा २० डिसेंबर २०२४ रोजी दिसला होता. दोन महिन्यांपासून धुमाकूळ घातलेल्या बिबट्यासाठी लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात या वाघोबाची छबी कैद झाली होती. यानंतर मागच्या साडेआठ महिन्यांपासून धाराशिव, सोलापूर व अहिल्यानगर या तीन जिल्ह्याच्या सीमेवरील वनक्षेत्रात त्याने आपले बस्तान ठोकले आहे. मागील तीन महिन्यांपासून तो सोलापूरच्या वनक्षेत्रात रमला होता. दरम्यान, आता त्याने धाराशिवकडे कूच केली आहे. शहरालगतच्या डोंगर रांगामध्ये वसलेल्या वरवंटी शिवारात गुरुवारी सकाळी महादेव टेकडीवर बिनधास्त वावरताना दिसून आला. त्याला पाहण्यासाठी शेतकरी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या टेकडीवरून वाघाने लगतच्या वनक्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला आहे. लगतच मोठ्या पमाणात शेतीक्षेत्र असल्याने शेतकऱ्यांमध्ये भय पसरले आहे.
वनविभागाची पेट्रोलिंग सुरू
वरवंटी शिवारात वाघ दिसल्याची माहिती कळताच वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महादेव टेकडीकडे धाव घेतली. यानंतर त्याच्यावर पहारा ठेवण्यासाठी तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात १० वनरक्षक व वनपालांचा समावेश आहे. या पथकांद्वारे वाघाचा माग काढणे सुरू असून, परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना वनविभागाने केल्या आहेत.
रेस्क्यू टीमच्याही हातावर तुरी
२० डिसेंबर २०२४ रोजी पहिल्यांदा वाघ आढळून आल्यानंतर रामलिंग अभयारण्यात पहिल्यांदा पुण्याची व नंतर ताडोबा अभयारण्यातील रेस्क्यू टीमने वाघाला ताब्यात घेण्यासाठी जवळपास महिनाभर जीवाचे रान केले. मात्र, प्रत्येक वेळी टप्प्यात आल्यानंतरही वाघाने टीमच्या हातावर तुरी दिल्या. सोलापूरच्या वनक्षेत्रात गेल्यानंतर ही मोहीम थंडावली.