निझामाच्या नजरेत धूळ फेकून राष्ट्रीय शाळेने घडविले क्रांतीकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:39 IST2021-09-17T04:39:13+5:302021-09-17T04:39:13+5:30
लोहारा : मराठवाडा मुक्तीसंग्रामाला ज्या शाळेतून खरी उर्जा मिळाली, त्या लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील राष्ट्रीय शाळेला यंदा १०० ...

निझामाच्या नजरेत धूळ फेकून राष्ट्रीय शाळेने घडविले क्रांतीकारक
लोहारा : मराठवाडा मुक्तीसंग्रामाला ज्या शाळेतून खरी उर्जा मिळाली, त्या लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील राष्ट्रीय शाळेला यंदा १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. निझामाची करडी नजर या शाळेवर असतानाही सशस्त्र लढ्यातील आक्रमक क्रांतीकारक घडविण्याचे कार्य येथून झाले. स्वामी रामानंद तीर्थ यांनी येथे मुख्याध्यापक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करतानाच देशभक्ती अन् स्वातंत्र्यलढ्याचे धडेही विद्यार्थ्यांना दिले.
निझामाच्या राजवटीत मातृभाषेतून शिक्षण घेण्याची सुविधा नव्हती. तेव्हा १९२१ साली हिप्परगा (रवा) येथे राष्ट्रीय शाळेची स्थापना झाली. त्याकाळी शाळा सुरू करणे म्हणजे निझाम सरकारचा राजद्रोह केल्यासारखे होते. तरीही देशप्रेमाने भारावलेल्या व्यंकटराव देशमुख व अनंतराव कुलकर्णी यांनी विश्वनाथ होणाळकर, आनंदराव पाटील यांच्या सहकार्याने ही राष्ट्रीय शाळा सुरू केली. १९२३ साली स्वामी रामानंद तीर्थ या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. वर्षभरातच शाळेचा पट १७६ वर गेला. अवघ्या चार ते पाच वर्षातच आडमार्गावर असलेल्या या शाळेकडे मुंबई प्रांत व हैद्राबाद संस्थानचे लक्ष वेधले गेले. विद्यार्थी व शिक्षक झोपडीत रहायचे. २३ शिक्षकांसाठी २३ झोपडया व ७८ खणाची इमारत तयार केली. येथे स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे,एस.के. केळकर, श्रीपाद कुलकर्णी, अमृत गवळी आदी शिक्षक होते. शाळेतून ज्ञानदानासोबतच ज्वलंत राष्ट्रभक्तीचे धडे दिले जायचे. त्यामुळे साहजिकच शाळेवर लक्ष ठेवण्यासाठी निझामाने येथे पोलीस चौकी बांधली. चार पोलीस व एक अमीनसाब कोतवाली (सब इन्स्पेक्टर) यांची नेमणूक केली. तरीही त्यांच्या डोळ्यात धूळ फेकून स्वामी रामानंद तीर्थ व इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाचे व क्रांतीचे स्फुलिंग पेटविले. त्यामुळे या शाळेतून स्वातंत्र्याच्या महत्वाकांक्षेने भारलेल्या क्रांतीकारकाच्या फळया तयार झाल्या. १९४१ मध्ये शाळेने एक मोठा वार्षिकोत्सव (स्नेहसंमेलन) साजरा केला. १९४३ च्या उत्सवात वि.स. खांडेकर यांचे व्याख्यान झाले होते. यानंतर निझामाने संस्थाचालकाना अटक करणे, त्रास देणे, चौकीवर दररोज हजेरी लावणे, तसेच शिक्षकांना त्रास देण्यास सुरुवात केली. याच कालावधीत रझाकार चळवळही फोफावली होती. सोबतीला प्लेगची साथ आली. या सर्व बाबीमुळे १९४६ ला शाळेचे कामकाज बंद पडले. त्यानंतर याच शाळेची प्रेरणा घेऊन त्याच ठिकाणी १९८६ मध्ये नव्याने स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. ती आजतागायत सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रीय शाळेला यंदा १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या याठिकाणी एक स्मारक उभे आहे. मात्र, त्याचे सुशोभिकरण करण्याची गरज आहे. येथे संग्रहालय, वाचनालय उभारुन मुक्तीसंग्रामाच्या लढ्याला उजाळा देण्याची गरज ग्रामस्थांनी बोलून दाखविली.
कोट...
जिल्हा प्रशासनामार्फत मुक्तीसंग्रामातील महत्त्वाची स्मारके, संग्रामाचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. हिप्परगा (रवा) येथील राष्ट्रीय शाळेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दलही वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यातून मुक्तीसंग्राम लढ्याला निश्चितच उजाळा मिळेल.
-कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी
भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि त्यांनतर हैदराबाद मुक्तीसंग्रामात या शाळेचे मोठे योगदान आहे. शाळेच्या माध्यमातून जे कार्य झाले आहे ते ऐतिहासिक असे आहे. या ऐतिहासिक कार्यात सहभागी असलेल्या सर्वांचे ऋण कधीही पूर्ण करणे अशक्य आहे. या शाळेतील प्रेरणेची ऊब कायम राखण्यासाठी आपण निश्चितच पुढाकार घेणार आहोत.
-ज्ञानराज चौगुले, आमदार