मुलीकडे वाईट हेतूने एकटक पाहणाऱ्यास तीन महिन्याची सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 19:30 IST2019-01-01T19:27:52+5:302019-01-01T19:30:14+5:30
यात पीडित मुलगी, तिच्या मैत्रिणी आणि भावाची साक्ष महत्वाची ठरली़

मुलीकडे वाईट हेतूने एकटक पाहणाऱ्यास तीन महिन्याची सक्तमजुरी
उस्मानाबाद : गावाकडे जाण्यासाठी बसस्थानकात आलेल्या एका मुलीकडे टक लावून पाहणाऱ्या युवकास विशेष सत्र न्यायालयाने तीन महिने सक्तमजुरी व दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ ही घटना २० नोव्हेंबर २०१७ रोजी तुळजापूर शहरातील बसस्थानकात घडली होती़
याबाबत अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी दिलेली माहिती अशी की, तुळजापूर येथील नवीन बसस्थानकात २० नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी एक मुलगी शाळा सुटल्यानंतर गावाकडे जाण्यासाठी आली होती़ ती मुलगी बसची वाट पाहत असताना एक मुलगा तिच्याकडे वाईट उद्देशाने एकटक पाहत होता़ त्या मुलाचे हे कृत्य मुलीने तिच्या भावाला सांगितले़ तिच्या भावाने त्या मुलाला जाब विचारताच त्यास मारहाण करण्यात आली़ मुलीने तिच्या वडिलांना फोन करून बसस्थानकात बोलावून घेतले़ तिच्या वडिलांनी त्याला पकडून तुळजापूर पोलीस ठाण्यात नेले़ याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून बालाजी हरिश्चंद्र सरडे (रा़तुळजापूर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़
या प्रकरणाचा पोउपनि सिमाली कोळी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ या प्रकरणाची उस्मानाबाद येथील विशेष सत्र न्यायाधीश आऱजे़राय यांच्या समोर सुनावणी झाली़ या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्ष व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश राय यांनी आरोपी बालाजी हरिश्चंद्र सरडे याला भादंवि कलम ३२३ नुसार तीन महिने सक्तमजुरी, एक हजार रूपये दंड व दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमचे कलम १२ नुसार तीन महिने सक्तमजुरी व एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली़
आठ जणांची साक्ष
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षाच्या वतीने आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली़ यात पीडित मुलगी, तिच्या मैत्रिणी आणि भावाची साक्ष महत्वाची ठरली़