रझाकारांच्या गोळीबारात १३ तरुण पडले होते धारातीर्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:39 IST2021-09-17T04:39:41+5:302021-09-17T04:39:41+5:30
कळंब : चैत्राच्या रखरखत्या उन्हात घाडगेंच्या आमराईतील भरल्या बाजारात निजामी राजवटीचे जुलमी ‘बळ’ अचानक दाखल झाले. वार, प्रतिवार चालू ...

रझाकारांच्या गोळीबारात १३ तरुण पडले होते धारातीर्थी
कळंब : चैत्राच्या रखरखत्या उन्हात घाडगेंच्या आमराईतील भरल्या बाजारात निजामी राजवटीचे जुलमी ‘बळ’ अचानक दाखल झाले. वार, प्रतिवार चालू झाला. पण, धानोऱ्याच्या पहिलवानांची ‘लाठीकाठी’ हत्यारबंद निजामी शक्तीपुढे फिक्की ठरली. बंदुकीच्या फैरी झडल्या, यात क्षणार्धात १३ देवधानोरेकर धारातीर्थी पडले. दुसऱ्या दिवशी अख्खं गाव हैवानांनी पेटवून दिलं. देवधानोऱ्याची अवस्था ‘जळकं धानोरं’ अशी झाली आणि गावकरी अंगावरच्या कापडानिशी परागंदा झाले. हा चित्तथरारक प्रसंग कथन केला आहे देवधानोरा येथील स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण मारुती बोंदर यांनी.
हा प्रसंग घडला त्या १८ एप्रिल १९४८ रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण मारुती बोंदर हे १६ वर्षांचे होते. या काळात काँग्रेसी विचाराने प्रेरित होऊन जुलमी निजामी राजवटीचा ते प्रतिकार करीत होते. प्रभातफेऱ्या, गस्त यासह त्या काळी चळवळीचा पाया असलेल्या कॅम्पात त्यांचा सक्रिय सहभाग होता. हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अनुषंगाने त्यांच्याशी संवाद साधला असता अतिशय चित्तथरारक असा प्रसंग त्यांनी कथन केला.
त्या दिवशी देवधानोरा गावात आठवडी बाजार असल्याने संपूर्ण गाव गजबजले होते. याच दिवशी निजाम सरदार कासीम रझवीचा खास ‘हस्तक’ गुंडूबाशा रझाकारांचा फौजफाटा घेऊन गावात दाखल झाला. त्यांनी धाकदडपशाही सुरू केली असता प्रतिकारही सुरू झाला. ग्रामस्थांच्या काठ्या-कुऱ्हाडी विरुद्ध रझाकारांच्या बंदुकी असा संघर्ष पेटला. रझाकारांना विरोध करणारी शक्ती म्हणून निजामी सत्तेच्या डोळ्यांवर देवधानोरा गाव आले होते. याचा बीमोड करण्यासाठीच सुनियोजित कट करून गाव बेचिराख करण्याचा प्रयत्न केला गेला, असे बोंदर यांनी सांगितले.
देवधानोऱ्याचं जळकं धानोरा केलं...
गावातील दुसरे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाजीराव गणपतराव बोंदर म्हणाले, १८ एप्रिल १९४८ रोजी एका क्षणात १३ तरुण गोळीबारात धारातीर्थी पडल्याने गावकरी भयानक दहशतीखाली होते. जुलमी ताकदीने बाजार, घरंदारं लुटली. दुसऱ्या दिवशी रॉकेलने गावातील घरे, गंजी, गोठे पेटवून दिले. क्षणार्धात आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या गावात चिटपाखरू राहिलं नाही. लोक आपल्या गणगोताकडे, कॅम्पात ‘निर्वासित’ म्हणून आलेला दिवस काढू लागले. याच घटनाक्रमामुळे स्वातंत्र्योत्तर काळात महसुली ‘देवधानोरा’ असं नाव असलेलं आमचं गाव एकमेकांशी संवाद साधकांना मात्र ‘जळकं धानोरं’ म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं.
▪️ सहा महिने गावात दिवा पेटला नाही...
रझाकारानं गाव लुटलं अन् जाळलं. अडीचशे उंबऱ्याच्या गावातील लोक तोंड वळेल त्या गावात आणि नातेवाइकाकडे आश्रित म्हणून राहू लागले. सहा महिने गावात दिवा पेटला नाही. घराला दार अन् विहिरीला पायऱ्या राहिल्या नाहीत. या काळात पुढे स्वामी रामानंद तीर्थ चंद्रशेखर बाजपेयी, बाबासाहेब परांजपे या नेतृत्वाची साथ मिळाली. इकडून तडवळा, चिंचोलीच्या कॅम्पात आधार मिळाला. लोक परतू लागले. घरी स्थिरावू लागले. आजूबाजूच्या गावांतून ज्वारी वगैरे जिन्नस पोहचू लागले. कळंबच्या भगवानदास लोढा यांनी एक ट्रक घोंगड्या दिल्या. एकूणच विस्कटलेले गाव अन् घडी पुन्हा बसू लागली, असे लक्ष्मण बोंदर यांनी सांगितले.