प्रतीक्षा संपली, आजपासून घेता येईल तुळजाभवानीचे जवळून दर्शन... तेही कमी वेळेत!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 10:12 IST2025-08-21T10:11:22+5:302025-08-21T10:12:20+5:30
गाभाऱ्यातील जीर्णोद्धार कामाच्या निमित्ताने मागील २० दिवसांपासून बंद होते दर्शन

प्रतीक्षा संपली, आजपासून घेता येईल तुळजाभवानीचे जवळून दर्शन... तेही कमी वेळेत!!
लोकमत न्यूज नेटवर्क, तुळजापूर (जि.धाराशिव) : गाभाऱ्यातील जीर्णोद्धार कामाच्या निमित्ताने मागील २० दिवसांपासून बंद असलेले तुळजाभवानी देवीचे धर्म व देणगीदर्शन २१ ऑगस्टपासून पूर्ववत सुरू होत आहे. यामुळे भाविकांना आता कमी वेळेत व जवळून मूर्तीदर्शन करता येणार असल्याचे मंदिर संस्थानच्या वतीने कळविण्यात आले आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. १ ऑगस्टपासून गाभाऱ्यातील व सिंह गाभाऱ्यातील कामे पुरातत्त्व विभागाच्या निगराणीखाली हाती घेण्यात आली होती. त्यामुळे पहिल्या टप्प्यात १ ते १० ऑगस्टपर्यंत धर्म व देणगीदर्शन बंद करण्यात आले होते. मात्र, वेळेत काम पूर्ण न झाल्याने पुन्हा दहा दिवसांसाठी हे दर्शन बंद ठेवण्यात आले होते.
चोपदार दरवाजापासून कमी वेळेत दर्शन सोय
दरम्यान, आता आवश्यक काम पूर्णत्वाकडे गेल्याचे पुरातत्त्व विभागाने कळविल्यानंतर २१ ऑगस्टपासून ही विशेष दर्शन सुविधा पुन्हा सुरू करण्यात येत असल्याची माहिती मंदिर संस्थानने दिली. धर्मदर्शन व पेड दर्शन सुरू होत असल्याने भाविकांना आता चोपदार दरवाजापासून कमी वेळेत दर्शन घेता येणार असल्याचे मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी सांगितले. त्यामुळे भाविकांची प्रतीक्षा आता संपली आहे.