तुळजाभवानी मंदिर पुन्हा प्राचीन रूपात येणार, शिखराला सोन्याची झळाळी मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 20:29 IST2025-02-26T20:28:58+5:302025-02-26T20:29:37+5:30
सिमेंटचे नवे आवरण हटवून मंदिर पुन्हा प्राचीन रूपात आणण्यात येणार आहे

तुळजाभवानी मंदिर पुन्हा प्राचीन रूपात येणार, शिखराला सोन्याची झळाळी मिळणार
धाराशिव : पुरातत्व खात्याने केलेल्या तुळजाभवानी मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार शिखर बांधकामाच्या ओझ्यामुळे शिळाना भेगा पडल्या आहेत. परिणामी, सिमेंटचे जाड आवरण व दगडी बांधकाम काढून पुरातन स्वरूपातील शिखर बांधकाम व त्यावर सोन्याचे आवरण देण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी मंदिर समितीचे विश्वस्त आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिराचे प्राचीन शिखर चुना आणि जुन्या विटांपासून तयार करण्यात आलेले आहे. त्यावर नंतरच्या काळात अडीच फूट जाडीचे नवे सिमेंट काँक्रीटचे व दगडांचे आवरण दिल्यामुळे वजन वाढले आहे. परिणामी मंदिराचे शिखर ज्या तुळईवर उभे आहे, त्याच्या चार पैकी दोन दगडी शिळांना तडे गेले आहेत. यामुळे देवी मूर्ती व भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शिखरावरील आवरण काढावे लागेल, असा निष्कर्ष पुरातत्व विभागाने नोंदवला आहे. त्यामुळे याविषयी कोणतेही गैरसमज भाविक, नागरिकांनी करून घेण्याची गरज नाही. संपूर्ण शिखर उकलून पुन्हा उभारले जाणार आहे. प्राचीन काळी ज्या प्रकारचे शिखर होते तसे मूळ शिखर साकारून त्याला सोन्याने मढविण्यात येणार असल्याचे आ. पाटील म्हणाले. दरम्यान, मंदिराच्या कोणत्याही मूळ संरचनेला धक्का न लागू देता व मंदिराचे पावित्र्य जपत सहा महिन्यांमध्ये शिखराला पुरातन स्वरूप देता येईल, असा विश्वास पुरातत्व खात्याने व्यक्त केला आहे. यानुषंगाने शिखराला पुरातन स्वरूपात आणून त्यास अक्षरधाम, तिरुपती, शिर्डी मंदिराप्रमाणे सोन्याने मढविण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे विश्वस्त आ. राणा पाटील म्हणाले.
पुरातत्वाचा अहवाल काय सांगतो ?
पुरातत्व खात्याने मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. त्यात मंदिर बांधकाम हे दगडामध्ये असले तरी मुळ मंदिराच्या बांधकामध्ये वारंवार बदल करण्यात आल्याचे दिसून येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात संरचनात्मक बदल झालेला आहे. सध्या मंदिरावर शिखराचा अतिरिक्त भार पडला आहे. त्यामुळे शिखराची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तसेच तुळजाभवानी मातेचे मंदिर हे भूकंप क्षेत्र ४ च्या आणि किल्लारीच्या भूकंप प्लांट झोनच्या ८० कि.मी.च्या आत असल्याने मंदिराच्या गर्भगृहाचे व शिखराचे काम करणे आवश्यक असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. हे निष्कर्ष लक्षात घेता मुख्य मंदिराच्या गर्भगृहाचे व शिखराचे काम करणे आवश्यक असल्याचे विश्वस्त आ. राणा पाटील म्हणाले.