दर्शनाची ओढ! दिवाळीच्या सुटीत तुळजाभवानीच्या चरणी अडीच लाखांवर भाविकांनी टेकवला माथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 19:27 IST2025-10-28T19:24:06+5:302025-10-28T19:27:50+5:30
यावर्षी दिवाळीच्या सलग आलेल्या सुट्टीमुळे नवरात्र काळात तुळजाभवानी देवीचे दर्शन घेता न आलेल्या भाविकांनी तुळजापुरात प्रचंड गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

दर्शनाची ओढ! दिवाळीच्या सुटीत तुळजाभवानीच्या चरणी अडीच लाखांवर भाविकांनी टेकवला माथा
तुळजापूर (जि. धाराशिव) : दिवाळीच्या आठवडाभराच्या सुट्टीत राज्यासह परराज्यातील अडीच लाखांवर भाविकांनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी माथा टेकवून दर्शन घेतले. मंदिरातील पीपल काऊंटिंग मशीनमधून ही आकडेवारी समोर आली असून, यापेक्षा जास्त भाविकांनी गर्दी पाहून महाद्वारावरूनच दंडवत घालत देवीचे आशीर्वाद मागितले.
यावर्षी दिवाळीच्या सलग आलेल्या सुट्टीमुळे नवरात्र काळात तुळजाभवानी देवीचे दर्शन घेता न आलेल्या भाविकांनी तुळजापुरात प्रचंड गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. २० ऑक्टोबरपासून राज्यातीलच नव्हे तर परराज्यातील भाविकांचीही तुळजापुरात मोठी गर्दी झाली होती. मंदिरात बसवण्यात आलेल्या पीपल काऊंटिंग मशीनवर २० ऑक्टोबरपासून भाविकांनी तुळजाभवानी मातेसमोर दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. गेल्या चार दिवसात तब्बल १ लाख ४ हजार ५२३ भाविकांनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्याची आकडेवारी मंदिर संस्थानच्या पीपल काऊंटिंग मशीनमधून समोर आली आहे. १० ते २६ ऑक्टोबर या कालावधीत २ लाख ३६ हजार २६४ भाविकांनी मंदिरात दर्शन घेतल्याचे या मशीनवरुन स्पष्ट झाले. दरम्यान, गर्दी लक्षात घेत मंदिराबाहेरील महाद्वारावरूनच यापेक्षाही अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याने दिवाळीच्या सुट्टीत ५ लाखांपेक्षा जास्त भाविकांनी तुळजापूर गाठल्याचे स्पष्ट झाले.
बाजारपेठेत चैतन्य, चेहऱ्यावर आनंद
नवरात्रात पावसामुळे अपेक्षित गर्दी झाली नसली, तरी दिवाळीच्या सलग सुट्टीमुळे तुळजापूरची बाजारपेठ अक्षरशः यात्रेसारखी फुलून गेली. प्रसाद, हार-फुले, नारळ, अगरबत्ती, देवीच्या प्रतिमा, खेळणी आणि मिठाई यांच्या विक्रीने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण होते. हॉटेल, भोजनालये, लॉज आणि पार्किंग स्थळेही भाविकांनी फुलली होती.
सात दिवसांची दर्शन आकडेवारी...
दिनांक दर्शनार्थी भाविक
२० ऑक्टोबर : २१,०७५
२१ ऑक्टोबर : २०,२३६
२२ ऑक्टोबर : २९,९०७
२३ ऑक्टोबर : ३३,३०५
२४ ऑक्टोबर : ४१,७९३
२५ ऑक्टोबर : ४६,३३९
२६ ऑक्टोबर : ४३,६०९