हलगीच्या गजरात निघाला महावितरणवर मोर्चा; सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ वैतागले
By गणेश कुलकर्णी | Updated: September 4, 2023 19:27 IST2023-09-04T19:27:31+5:302023-09-04T19:27:52+5:30
महावितरणच्या ईट येथील उपकेंद्रातून ईटसह परिसरातील १७ गावांना वीजपुरवठा केला जातो.

हलगीच्या गजरात निघाला महावितरणवर मोर्चा; सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ वैतागले
धाराशिव : भूम तालुक्यात सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या ईट गावातील एका डीपीवरून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ जाम वैतागले असून, वारंवार पाठपुरावा करूनही याबाबत कार्यवाही होत नसल्याने सोमवारी हलगी वाजवत महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला.
महावितरणच्या ईट येथील उपकेंद्रातून ईटसह परिसरातील १७ गावांना वीजपुरवठा केला जातो. यासाठी येथे अभियंता, कनिष्ठ यंत्र चालक, लाइनमन, वाहिनी मदतनीस अशी अनेक पदे मान्य आहेत. त्यापैकी काही पदे रिक्त असून, आहेत ते कर्मचारीही कामात हयगय करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. अनेकदा फ्युज टाकण्यासाठीही कर्मचारी मिळत नसल्याचे गावकरी सांगतात. वरिष्ठ कार्यालयाकडून देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी नेमलेले ठेकेदारही दुरुस्तीकडे दुर्लक्ष करतात. आवश्यक साहित्याचाही पुरवठा होत नाही. यातूनच येथील नागेवाडी फिडरवर असलेल्या चार डीपींचा विद्युत पुरवठा दोन महिन्यांपासून सतत खंडित होत आहे. येथील सिंगल फेजचे ट्रान्सफॉर्मर सतत नादुरुस्त असतात. मागील तीन दिवसांपासून मुख्य बाजारपेठ असलेल्या या डीपीवरील ग्राहक अंधारात आहेत. रविवारी वीज वितरण कंपनीकडून सिंगल फेजच्या तीन ट्रान्सफॉर्मरचा पुरवठा सुरू करण्यात आला. परंतु, हे तिन्ही ट्रान्सफॉर्मर चालू करण्याअगोदरच ते खराब असल्याचे आढळून आले. यामुळे संतप्त ग्राहकांनी वाजत-गाजत मोर्चा काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी युवा सेनेचे तालुकाप्रमुख नीलेश चव्हाण, मनोज हुंबे, बाळासाहेब जालन, बापू हुंबे, अशोक देशमुख, अशोक लिमकर यांच्यासह ग्राहक उपस्थित होते.
आंदोलनाचा दिला इशारा
या डीपीवरील ग्राहकांचा वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करावा; अन्यथा वीज वितरण कंपनीविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला. तसेच कामचुकार कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली करून दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.