शेतकऱ्यांच्या रक्ताने सरकारचे हात बरबटले; राजू शेट्टी यांचा घणाघात
By बाबुराव चव्हाण | Updated: January 15, 2024 19:06 IST2024-01-15T19:05:13+5:302024-01-15T19:06:35+5:30
सरकारच्या अशा धाेरणामुळे शेतकरी आणखी कंगाल हाेत आहे.

शेतकऱ्यांच्या रक्ताने सरकारचे हात बरबटले; राजू शेट्टी यांचा घणाघात
धाराशिव : एकीकडे शेतीमालाचे भाव पाडून, निर्यातबंदी करून उद्योगपतींना आयातीस मुभा दिली जाते. आणि दुसरीकडे उद्योगपतींचे भरमसाठ कर्ज माफ करून शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर साेडले जाते. सरकारच्या अशा शेतकरी विराेधी धाेरणामुळेच बळीराजा अडचणीत आला आहे. आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलत आहे. मागील अडीच वर्षांच्या तुलनेत वर्षभरात अडीच टक्क्यांनी शेतकरी आत्महत्या वाढल्या असून शेतकऱ्यांच्या रक्ताने सरकारचे हात बरबटले आहेत, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी घणाघात केला.
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर माेर्चा काढण्यात आला हाेता. यावेळी ते बाेलत हाेते.
माजी खासदार शेट्टी म्हणाले, आज सोयाबीनला भाव मिळत नाही. दुधाची दरवाढ तीन महिन्यांपर्यंत टिकते. त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती असते. सध्या सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळे देशातील ३० लाख लोकांचा रोजगार बुडाला आहे. पाम तेलाची आयात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली. आणि साेयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा अशा मालाला माेठा फटका बसला. सरकारच्या अशा धाेरणामुळे शेतकरी आणखी कंगाल हाेत आहे. तर, उद्याेगपती श्रीमंत, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत जेवढी कर्जमाफी ६५ टक्के शेतकऱ्यांना दिली, त्या तुलनेत १ टक्का असलेल्या उद्याेगपतींना मात्र, १० पट कर्ज माफ करण्यात आले. त्यामुळे आता या सरकारला जाब विचारण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांचा सातबारा काेरा झाल्याखेरीज आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी शेतकरी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.