तेरणा ओव्हरफ्लो, उस्मानाबादकरांची चिंता दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:38 IST2021-09-24T04:38:26+5:302021-09-24T04:38:26+5:30
तेर : उस्मानाबाद शहरासह तेर, ढोकी, येडशी, तडवळा, कावळेवाडी या प्रमुख गावांची तहान भागविणारा तेरणा मध्यम प्रकल्प सलग दुसऱ्या ...

तेरणा ओव्हरफ्लो, उस्मानाबादकरांची चिंता दूर
तेर : उस्मानाबाद शहरासह तेर, ढोकी, येडशी, तडवळा, कावळेवाडी या प्रमुख गावांची तहान भागविणारा तेरणा मध्यम प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरला आहे. दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे नदीपात्राद्वारे पाण्याची आवक वाढून गुरुवारी सकाळी प्रकल्पाचा सांडवा ओसंडून वाहू लागला. यामुळे शेतकऱ्यांतही आनंद निर्माण झाला आहे.
तेरणा धरणामुळे परिसरातील हजारो हेक्टर्स जमीन ओलिताखाली आली आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून १६५२ हेक्टर्स शेती ओलिताखाली आली आहे. तर बंद पाईपलाईन योजनेंतर्गत २३३० हेक्टर्स जमीन आहे. दरम्यान, गतवर्षी धरण भरल्यानंतर ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली होती. आता तेरणा कारखाना पुन्हा सुरू करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे यावर्षीही ऊस क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
६ वेळेस भरले धरण...
२००३ ते २०२१ या १८ वर्षांच्या कालावधीत तेरणा धरण ६ वेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे. यापूर्वी २००६, २००८, २०१०, २०१६, २०१७ साली धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहिले. योगायोग म्हणजे गतवर्षी २१ सप्टेंबर रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहिले होते. यावर्षी २३ सप्टेंबर म्हणजेच केवळ दोन दिवस उशिराने ते भरून वाहत आहे.
तरुणांची स्टंटबाजी...
धरण पूर्ण भरून वाहत असल्याने पाणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात धरणावर गर्दी होत आहे. या गर्दीतील अनेक हौशी तरुण जीवावर उदार होऊन फोटोसेशन करीत असल्याचे चित्र याठिकाणी पहायला मिळत आहे.