ध्वजारोहणाचा विसर पडलेल्या बँकांना तहसीलदारांची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST2021-09-22T04:36:57+5:302021-09-22T04:36:57+5:30

१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जातो. यानिमित्त शासकीय सुट्टी तर असतेच, शिवाय शासकीय कार्यालय, निमशासकीय आस्थापना, ...

Tehsildar's notice to banks for forgetting flag hoisting | ध्वजारोहणाचा विसर पडलेल्या बँकांना तहसीलदारांची नोटीस

ध्वजारोहणाचा विसर पडलेल्या बँकांना तहसीलदारांची नोटीस

१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जातो. यानिमित्त शासकीय सुट्टी तर असतेच, शिवाय शासकीय कार्यालय, निमशासकीय आस्थापना, सहकारी व शैक्षणिक संस्थांमध्ये ध्वजारोहण केले जाते. असे असले तरी कळंब शहरातील विविध राष्ट्रीयीकृत बँका, पोस्ट कार्यालय, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयामध्ये मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले नव्हते. विशेषतः या दिवशी उपरोक्त कार्यालयात देण्यात आलेल्या सुट्टीचा लाभ घेण्यात आला होता. एकूणच सदर कृती ध्वजसंहिता २००२ व मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त देण्यात आलेल्या शासन आदेशाचा भंग करणारी अशी होती. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते धनंजय कुलकर्णी यांनी तक्रार देत कार्यवाही करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, याप्रकरणी प्रभारी तहसीलदार प्रथमेश भुर्के यांनी कळंब शहरातील पोस्ट कार्यालय, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक आदी पाच व्यवस्थापकांना नोटीस बजावली असून तत्काळ खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

कारवाई होईल की, निव्वळ फार्स...

तालुक्यातील अगदी लहानसहान पतसंस्था, जिल्हा बँक शाखेत मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी ध्वजारोहण केले जात असताना बड्या बँकांना मात्र याचा विसर पडला. अशीच स्थिती गावपातळीवर स्वतंत्र कार्यालयाचा दर्जा असलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयातही घडत आहे. मागच्या अनेक वर्षांपासून अशीच स्थिती आहे. यामुळे याविषयी काही कारवाई होते की, केवळ नोटिसीचा फार्स करत वेळ मारून नेली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे झाले तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे.

Web Title: Tehsildar's notice to banks for forgetting flag hoisting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.