बनावट डिझेल विक्रीप्रकरणी कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:38 IST2021-09-15T04:38:12+5:302021-09-15T04:38:12+5:30
उमरगा : बनावट डिझेल विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी; अन्यथा सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा इशारा पेट्रोल पंप ...

बनावट डिझेल विक्रीप्रकरणी कारवाई करा
उमरगा : बनावट डिझेल विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी; अन्यथा सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा इशारा पेट्रोल पंप चालक संघटनेने मंगळवारी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, उमरगा हा भाग कर्नाटक व आंध्र प्रदेशाच्या सीमेजवळ आहे. त्या दोन राज्यांत तेथील सरकारने अशा बनावट डिझेल विक्रीला बंदी घातली आहे. त्यामुळे त्या भागातील असे अवैध धंदेवाले व माफियांनी या भागात स्थानिकांना हाताशी धरून बनावट डिझेल विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. या बनावट डिझेलमुळे वाहनाच्या मशिनरीचा बिघाड होत असून, शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूलदेखील बुडत आहे. त्यामुळे या भागातील बनावट डिझेलवर कायम बंदी आणून कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावर उमरगा तालुका पेट्रोल पंप चालक संघटनेचे अध्यक्ष रझाक अत्तार, सचिव उमेश स्वामी, उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे आदींसह पेट्रोल पंप मालकांच्या सह्या आहेत.