पाच मिनिटांत उरकली पाहणी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:37 IST2021-09-23T04:37:10+5:302021-09-23T04:37:10+5:30

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथे झालेल्या अतिवृष्टी व मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीलगत असलेल्या क्षेत्रात पाणी घुसल्याने पिकांचे ...

Survey completed in five minutes ..! | पाच मिनिटांत उरकली पाहणी..!

पाच मिनिटांत उरकली पाहणी..!

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथे झालेल्या अतिवृष्टी व मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीलगत असलेल्या क्षेत्रात पाणी घुसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या अनुषंगाने १७ सप्टेंबर रोजी पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी पाहणी केल्यानंतर बुधवारी औरंगाबाद येथील प्रभारी उपायुक्त वीणा सुपेकर यांनी पाहणी केली. परंतु, त्यांनी रस्त्यावर थांबून दोनच मिनिटांत पाहणी उरकल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला.

पारगाव हे राष्ट्रीय महामार्गावरील मांजरा नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. मांजरा नदीच्या उगम क्षेत्रात व पारगाव येथे गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाल्यामुळे या भागातील जनकापूर, पांगरी गावचा संपर्क तुटला होता. तसेच नदीलगत असलेल्या क्षेत्रात पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे महसूल व कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात १७ सप्टेंबर रोजी पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी पारगाव येथील शेतकरी विनायक आखाडे यांच्या शेतात जाऊन पाहणी केली होती. या वेळी शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.

पालकमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर बुधवारी प्रभारी उपायुक्त वीणा सुपेकर यांचा पीक नुकसानीबाबत मांजरा नदीकाठच्या गावात दौरा नियोजित केलेला होता. या दौऱ्याची वेळ सकाळी साडे दहा वाजता असल्यामुळे सकाळी ९ वाजल्यापासूनच वाशीचे गटविकास अधिकारी राजगुरू, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले त्यांच्या सहकाऱ्यांसह येथे उपस्थित होते. उपआयुक्त सुपेकर या साडेअकरा वाजेच्या सुमारास पारगावात दाखल झाल्या. येथे राज्य मार्गावर थांबूनच त्यांनी शेतकरी विनायक आखाडे यांच्या शेताची पाहणी केली. याच ठिकाणी दोन मिनिटांचा संवाद साधला. यानंतर जनकापूर येथील शेतकरी कौशल्या गपाट यांच्या पिकाची पाहणीही रस्त्यावर थांबून दोन मिनिटांतच उरकली व शासन ठरवेल त्याप्रमाणे मदत मिळवून देऊ, असे सांगितले. पारगाव, जनकापूर येथील पाहणी करून त्या मांजरा नदीकाठच्या गावातील पूर परिस्थितीत नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी रवाना झाल्या. या वेळी त्याच्या सोबत वाशीचे तहसीलदार नरसिंग जाधव, मंडळ अधिकारी शिवाजी उंदरे उपस्थित होते. पाहणी दौऱ्यावेळी सरपंच महेश कोळी, उपसरपंच पंकज चव्हाण, ग्रा. पं. सदस्य राजाभाऊ कोळी, सुशांत कोकणे यांच्यासह श्रीमंत निंगुळे, अमोल गायकवाड, आर. ए. डोके, गणेश आखाडे, राजेंद्र क्षीरसागर, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.

चौकट.....

अहवाल सादर...

पारगाव व जनकापूर येथील नुकसानीचा अहवाल या वेळी तलाठी किशोर उंदरे, कृषी सहायक अमोल मुळे, ग्रामविकास अधिकारी प्रवीण देशमुख यांनी उपआयुक्त वीणा सुपेकर यांना दिला. या अहवालानुसार पारगाव येथील एकूण १६६९ क्षेत्रापैकी १६४७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यातील सोयाबीनचे नुकसान ३७१ हेक्टर तर इतर पिकांचे १३ हेक्टर असे एकूण ३९३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. यातील पारगावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ४४३ आहे. तसेच जनकापुरातील एकूण ४४७ हेक्टर क्षेत्रापैकी ४६० हेक्टरवरील सोयाबीन ८४ हेक्टर तर ८ हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले आहे. येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या १३५ आहे.

कोट......

उपायुक्त येणार असल्याने सकाळपासून थांबून होतो. परंतु, त्या आल्या आणि रस्त्यावर बोलून दोन मिनिटांत गेल्या. अहवाल दिलेला आहे. सरकारच्या निर्णयाप्रमाणे मदत मिळेल, असे सांगितले. महापुराची व अतिवृष्टीची नोंद असूनही शासन का टाळाटाळ करत आहे, हे कळत नाही. त्यामुळे आजचा पाहणी दौराही केवळ फार्स होता की काय असे वाटले.

- विनायक आखाडे, शेतकरी

Web Title: Survey completed in five minutes ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.