सुलतानी तर होतेच, सोयाबीनच्या फडावर आता अस्मानी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:39 IST2021-09-24T04:39:08+5:302021-09-24T04:39:08+5:30

कळंब - एकीकडे काढणी होऊन बाजारात विक्रीसाठी आलेले सोयाबीन ‘बेभाव’ होत असतानाच, दुसरीकडे वावरात उभ्या असलेल्या सोयाबीनवर पाऊस कोसळत ...

The Sultani was, so to speak, now in the throes of soybean crisis | सुलतानी तर होतेच, सोयाबीनच्या फडावर आता अस्मानी संकट

सुलतानी तर होतेच, सोयाबीनच्या फडावर आता अस्मानी संकट

कळंब - एकीकडे काढणी होऊन बाजारात विक्रीसाठी आलेले सोयाबीन ‘बेभाव’ होत असतानाच, दुसरीकडे वावरात उभ्या असलेल्या सोयाबीनवर पाऊस कोसळत आहे. सुलतानी संकटाचा सामना करत असतानाच, अस्मानी संकटही कोसळत असल्याने तालुक्यात असंख्य शेतकऱ्यांचे सोयाबीनचे फड पाण्यात गेले आहेत.

मागच्या पाच वर्षांत वीस हजार हेक्टर क्षेत्र असलेले सोयाबीनचे क्षेत्र यंदा तब्बल साठ हजार हेक्टरवर पोहोचले आहे. सोयाबीन क्षेत्रात वेगाने झालेल्या या वृद्धीमुळे सोयाबीन हे तालुक्यातील खरीप हंगामातील प्रमुख पीक ठरले आहे. यंदा सोयाबीन वावरात जसजसे वाढत होते, तसतसा बाजारात याचा दरही वाढत होता. मागच्या महिन्याभरात तर यात उच्चांकी वृद्धी नोंदली जाऊन, सोयाबीनचा दर ''दसहजारी'' पार करून गेला. यामुळे प्रतिकूल हवामान व अन्य कारणांमुळे उत्पादनात घट झाली तरी, वाढलेला भाव ''मालामाल'' करून जाईल, असा विश्वास शेतकऱ्यांना होता. मात्र, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात काही शेतकऱ्यांची काढणी होऊन, त्यातून हाती आलेला माल मोंढ्यात पोहोचतो न पोहोचतो तोच, भाव घसरण्यास सुरुवात झाली. पुढे आठच दिवसात दहा हजाराच्या आसपास असलेला दर सहा हजाराच्या आसपास येऊन ठेपला. यात सातत्याने घट होत असल्याने शेतकरी हवालदिल बनला आहे. हे कमी होते की काय, म्हणून मागच्या चार दिवसांपासून पावसाचे ''कमबॅक'' झाले असून हा पाऊसही उरला सुरला सूड उगवत असल्याचे दिसून येत आहे.

चौकट...

९० टक्के सोयाबीन फडात...

साधारणतः जूनच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात पेरणी झालेल्या तालुक्यात ६० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी केली होती. यापैकी सध्या केवळ पाच ते दहा टक्के लोकांचा काढणी हंगाम काढणी व मळणी या टप्प्यावर आहे. उर्वरित नव्वद टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन फडात उभे असून शेंगा पक्व झालेले हे पीक आता काढणीस आले आहे.

पिवळ्या सोन्यावर पावसाचे ढग...

सध्या बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक काढणीस आले आहे. यासाठी पावसाने उघडीप देणे गरजेचे आहे. यातच सोमवारपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. यात बुधवार व गुरुवार या दोन दिवसांत नुकसानकारक पाऊस पडल्याने अनेकांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. फड पाण्यात आहेत.

तक्ता...

या पावसाचा काय परिणाम...

माल डॅमेज होत आहे.

यामुळे भाव कमी मिळेल

उत्पादनात घट होईल

प्रतवारी कमी होईल

मळणीस अडथळे येतील

राशी भिजल्यावर नुकसान

झाकाझाकी करण्याचा भुर्दंड

बाजारात पडझड सुरूच

कळंब येथील मोंढ्यात चार दिवसात एक हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सोमवारी ६ हजार ९०० असलेला दर गुरुवारी ५ हजार ५०० वर येऊन ठेपला आहे. मोंढ्यातील दरात ही पडझड सुरू असतानाच खेड्यातील फडी लुटीचे अड्डे ठरले जात आहेत.

Web Title: The Sultani was, so to speak, now in the throes of soybean crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.