व्यवसायात दिलेले पैसे मिळत नसल्याने आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST2021-07-05T04:20:57+5:302021-07-05T04:20:57+5:30
खामसवाडी : व्यवसायासाठी दिलेले पैसे परत देण्यास भागिदारांनी टाळाटाळ केल्यामुळे २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना २ जुलै रोजी ...

व्यवसायात दिलेले पैसे मिळत नसल्याने आत्महत्या
खामसवाडी : व्यवसायासाठी दिलेले पैसे परत देण्यास भागिदारांनी टाळाटाळ केल्यामुळे २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना २ जुलै रोजी कळंब तालुक्यातील खामसवाडी शिवारात घडली. याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील संतोष दिनकर शेळके यांनी खामसवाडी ते तडवळा रस्त्यावर खामसवाडी शिवारात धाराशिव ॲग्रो सुग्रास निर्मितीच्या कारखान्याची उभारणी सुरु केली होती. यासाठी त्यांनी त्यांचे भागिदार असलेले वैभव कुलकर्णी व गणेश सावंत याच्याकडे पैसे दिले होते. या पैशांची ते वारंवार मागणी करीत होते. परंतु, भागिदारांकडून ते परत मिळत नसल्यामुळे संतोष शेळके यांनी २ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतातील चिंचेच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी संतोष यांनी स्वत:जवळ चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात भागिदारांकडून पैसे मिळत नसल्यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासास कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. जाधवर यांनी शवविच्छेदन केले. याप्रकरणी मयताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात वरील दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. प्रकरणाचा अधिक तपास बीट जमादार दयानंद गादेकर हे करत आहेत