अचानक परीक्षा रद्द विद्यार्थी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:35 IST2021-09-26T04:35:33+5:302021-09-26T04:35:33+5:30
उस्मानाबाद : आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील परीक्षा शनिवारी व ड संवर्गातील परीक्षा रविवारी होणार होती. आरोग्य विभागाने शुक्रवारी ...

अचानक परीक्षा रद्द विद्यार्थी संतप्त
उस्मानाबाद : आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील परीक्षा शनिवारी व ड संवर्गातील परीक्षा रविवारी होणार होती. आरोग्य विभागाने शुक्रवारी रात्री उशिरा परीक्षा रद्द केल्याची सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. अचानक परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामाेरे जावे लागले. तर काही विद्यार्थी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात शुक्रवारी पोहोचले होते. या विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.
परीक्षा देण्यासाठी जे प्रवेश पत्र जाहीर करण्यात आले आहेत, त्या प्रवेश पत्रांवर महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना नोएडाचे परीक्षा केंद्र दाखवण्यात आलं आहे. आरोग्य विभाग एवढ्यावरच थांबला नाही तर प्रवेश पत्रांवर अनेक विद्यार्थ्यांच्या वडिलांचं नावही बदलण्यात आलं आहे. काहीजणांच्या हॉलतिकीटवर नाव एकाचे व फोटो दुसऱ्याचा होता. पत्रांवर अनेक त्रुटी असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला होता. आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रवेशपत्रात मोठ्या प्रमाणात त्रुटी होत्या. परीक्षा एक दिवसावर आली असताना अशा प्रकारे गोंधळ उडाल्याने विद्यार्थी चिंतेत होते. ज्या विद्यार्थ्यांना हॉलतिकिट मिळाले त्यांनी ज्या शहरात परीक्षा केंद्र आहे. त्या शहरात शुक्रवारीच रात्री पोहोचले होते. मात्र, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा रद्द झाल्याचे रात्री उशिरा जाहीर केले. त्यामुळे अचानक परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामाेरे जावे लागले. तसेच प्रवास करुन परीक्षा असलेल्या शहरात गेलेल्या विद्यार्थ्यांचा वेळ व पैसाही खर्च झाला.
त्यामुळे विद्यार्थ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
शुक्रवारीच पोहोचलो नांदेडला
कनिष्ठ लिपीक पदासाठी ठाणे जिल्ह्यासाठी अर्ज केला होता. परीक्षा केंद्र लातूर निवडले. केंद्र नांदेड आल्याने शुक्रवारीच नांदेड शहरात पोहोचलो. रात्री उशिरा परीक्षा रद्द झाल्याचे समजल्यानंतर हिरमोड झाला. प्रवासाठी ८०० रुपये, राहणे १ हजार २०० रुपये, जेवण असा तीन हजार रुपये खर्च झाला. शिवाय, दोन दिवसाचा वेळही वाया गेला.
आलीम सय्यद, परीक्षार्थी
वर्ग क संवर्गातील लॅब टेक्निशियनची परीक्षा लातूर येथे होणार होती. सकाळी १० वाजता पेपर असल्याने शुक्रवारी लातूर शहरात पोहोचलो. त्यानंतर परीक्षा रद्द झाल्याचे समजले. यासाठी वेळ व पैसाही खर्च झाला आहे. शासनाने परीक्षा घेता वेळी हॉलतिकीट व्यवस्थित देणे गरजेचे आहे.
दीपक लांडगे, परीक्षार्थी
एकाच शहरात दोन पेपर घ्यावे
काही विद्यार्थ्यांनी दोन वेगवेगळ्या पदासाठी अर्ज केले. एका परीक्षार्थ्याने टेलिफोन ऑपरेटर व कनिष्ठ लिपीक या पदासाठी अर्ज केले होते. दोन्ही शनिवारीच होणार होते. कनिष्ठ लिपीक पेपर सकाळी १० ते १२ या वेळेत नांदेड येते. तर ३ ते ५ या वेळेत लातूर या शहरात टेलिफोन ऑपरेटर पदासाठी परीक्षा होणार होती. शासनाने यापुढे गैरसोय टाळण्याकरिता एकाच शहरात दोन्ही पेपर घ्यावे. अशी मागणीही विद्यार्थ्यांकडून होत आहे.