२० रुग्णवाहिका खरेदीस राज्य शासनाची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST2021-07-03T04:21:24+5:302021-07-03T04:21:24+5:30
उस्मानाबाद : जिल्हा परिषद प्राथमिक आराेग्य केंद्रांना रुग्णांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका पुरविण्यात आल्या आहेत. परंतु, यापैकी अनेक रुग्णवाहिका कालबाह्य ...

२० रुग्णवाहिका खरेदीस राज्य शासनाची मंजुरी
उस्मानाबाद : जिल्हा परिषद प्राथमिक आराेग्य केंद्रांना रुग्णांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका पुरविण्यात आल्या आहेत. परंतु, यापैकी अनेक रुग्णवाहिका कालबाह्य झाल्या असतानाही त्यातून रुग्णांचा प्रवास सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लाेकमत’ने उजेडात आणला हाेता. यानंतर जिल्हा परिषदेने १३व्या वित्त आयाेगाचा अखर्चित निधी व चाैदाव्या वित्त आयाेगाच्या व्याजातील रकमेतून रुग्णवाहिका खरेदीस मंजुरी मिळावी, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला हाेता. सततच्या पाठपुराव्यानंतर शासनाने १ जुलैला स्वतंत्र आदेश काढून २० रुग्णवाहिका खरेदीस मंजुरी दिली आहे. यासाठी ३ काेटी २० लाख रुपये एवढा निधी मंजूर केला आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांना नाममात्र शुल्कात आराेग्य सेवा मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक आराेग्य केंद्र चालविली जातात. आजघडीला जिल्ह्यात जवळपास ४३ प्राथमिक आराेग्य केंद्र आहेत. रुग्णांना ने-आण करण्यासाठी प्रत्येक केंद्रास एक रुग्णवाहिका पुरविण्यात आली आहे. परंतु, यातील अनेक रुग्णवाहिका कालबाह्य झाल्या आहेत. एकीकडे शासन कालबाह्य वाहने स्क्रॅपमध्ये काढावीत, असे सांगते. मात्र, दुसरीकडे चक्क रुग्णांचीच ने-आण कालबाह्य रुग्णवाहिकांतून सुरू आहे. रुग्णांच्या जीविताशी सुरू असलेला हा खेळ ‘लाेकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी राज्याच्या ग्रामविकास विभागास १ मार्च २०२१ राेजी पत्र पाठविले हाेते. तेराव्या वित्त आयाेगातील अखर्चित निधी व चाैदाव्या वित्त आयाेगाच्या व्याजाच्या रकमेतून रुग्णवाहिका खरेदीस मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी केली हाेती. तसा रीतसर प्रस्तावही दाखल केला हाेता. वेळाेवेळी पाठपुरावा करूनही प्रस्तावाला मंजुरी मिळत नव्हती. यानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी हा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हा प्रश्न मांडला. तसेच जिल्हा परिषदेकडूनही वेळाेवेळी पाठपुरावा करण्यात आला. अखेर या पाठपुराव्यास यश आले आहे. ग्रामविकास विभागाने २० रुग्णवाहिका खरेदीस मंजुरी दिली आहे. यासाठी सुमारे ३ काेटी २० लाख रुपये एवढा निधी मंजूर केला आहे. रुग्णवाहिकांची खरेदी ‘जीइएम’ पाेर्टलवरून करण्याचे निर्देश आहेत. एका रुग्णवाहिकेसाठी १६ लाख रुपये एवढी रक्कम निश्चित करून दिली आहे.
चाैकट...
रुग्णांची गैरसाेय दूर हाेणार : कांबळे
जिल्ह्यातील रुग्णवाहिकांचे वास्तव ‘लाेकमत’ने समाेर आणल्यानंतर नवीन रुग्णवाहिका खरेदीसाठीचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठविण्यात आला हाेता. परंतु, अनेक दिवस त्यावर कुठलाच निर्णय झाला नाही. यानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी हा मुद्दा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडला. त्यावर तातडीने सूचना करण्याची ग्वाही त्यांनी दिली हाेती. त्यानुसार जिल्हा परिषदेला २० रुग्णवाहिका खरेदी करण्यास मंजुरी मिळाली आहे. यासाठी ३ काेटी २० लाख रुपये एवढा निधी मंजूर झाला आहे. या माध्यमातून आता रुग्णांचा कालबाह्य रुग्णवाहिकांतून सुरू असलेला प्रवास थांबणार आहे.
- अस्मिता कांबळे, अध्यक्षा, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.