कागदी तिकिटांना लागते थुंकी, मशीन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:39 IST2021-09-17T04:39:39+5:302021-09-17T04:39:39+5:30
उस्मानाबाद : एसटीत कागदी तिकिटे हद्दपार होऊन मशीन्सचा वापर सुरू झालेला आहे. मात्र, मध्यतंरी बसेस बंद असल्याने मशीनचा वापर ...

कागदी तिकिटांना लागते थुंकी, मशीन द्या
उस्मानाबाद : एसटीत कागदी तिकिटे हद्दपार होऊन मशीन्सचा वापर सुरू झालेला आहे. मात्र, मध्यतंरी बसेस बंद असल्याने मशीनचा वापर थांबला अन् त्यातील अनेक मशीन बंद पडल्या. परिणामी, एसटी पुन्हा कागदी तिकिटांकडे वळली आहे. मात्र, त्यास थुंकीचा वापर करावा लागत असल्याने कोरोना रोखण्यासाठी मशीनच द्यावे, असा आग्रह वाहकांनी एसटीकडे धरला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून कोणतीही पूर्वसूचना न देता वाहकांना कागदी तिकिटे दिली जात आहेत. कोरोनाची लाट उसळली तेव्हा बसेस बंद होत्या. त्यामुळे मशीन्सचा वापर होत नव्हता. परिणामी, काही मशीन बंद पडल्या होत्या. बसेस सुरू झाल्यानंतर सुरुवातीला काहींना कागदी तिकिटे तर काहींना मशीन देऊन वेळ भागविण्यात आली. मात्र, यास बराच कालावधी उलटून गेल्यानंतर आता आठवडाभरापासून पुन्हा बहुतांश वाहकांना कागदी तिकिटे दिली जात आहेत. ही तिकिटे एकमेकांना घट्ट चिकटलेली असतात. त्यामुळे एक तिकीट काढायचे झाले तरी थुंकीचा वापर केल्याशिवाय वाहकांपुढे पर्याय नसतो. बसच्या एका खेपेला किमान शंभरवेळा तरी प्रवाशांना तिकिटे दिली जातात. त्यातही एका प्रवाशाला सरासरी दोन ते तीन तिकिटे द्यावी लागतात. म्हणजेच दोन-तीनशे वेळा थुंकीचा वापर केला जातो. एकीकडे प्रशासन सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये म्हणून लोकांना दंड करते. अन् दुसरीकडे अगदी जवळून एका बसमधील शंभरेक प्रवाशांना वाहकाच्या थुंकीचा संपर्क येत असतो. या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यात लक्ष घालून पूर्ववत मशीन्सचा वापर सुरू करावा, तसेच ग्रामीण भागातील बसेसच्या फेऱ्या पूर्ववत कराव्यात, अशी मागणी वाहकांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, परिवहन विभागास लेखी म्हणणे सादर करून मशीनच्या वापरासाठी आग्रह धरला आहे.