अल्पवयीन मुलीचा विनयभंग: तिघांविरुद्ध गुन्हा
उस्मानाबाद : जिल्ह्यातील एका खेडेगावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तीन तरुणांनी पाठलाग करून विनयभंग केला. ही घटना २२ जानेवारी रोजी घडली.
एका १६ वर्षीय तरुणीचा गावातीलच ३ तरुणांनी दुचाकीवरून पाठलाग करून तिचा हात ओढून विनयभंग केला. याचा जाब मुलीच्या चुलत्याने विचारला असता, एका तरुणाने मुलीस उचलून नेण्याची धमकी दिली, अशी फिर्याद पीडित मुलीच्या आईने पोलिसात दिली. यावरून उपरोक्त तिघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला.
३०४ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
उस्मानाबाद : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी जिल्ह्यातील १८ पोलीस ठाणी व वाहतूक शाखेच्या वतीने धडक मोहीम राबविली जात आहे. २२ जानेवारी रोजी जिल्ह्यातील विविध मार्गावर नियम मोडणाऱ्या ३०४ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या वाहनचालकांकडून ६८ हजार ४०० रुपयांचा तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.
तेर येथे जुगार अड्ड्यावर छापा
उस्मानाबाद : तालुक्यातील तेर येथील एका जुगार अड्ड्यावर ढोकी पोलीस ठाण्याच्या पथकाने २२ जानेवारी रोजी छापा टाकला. यावेळी सचिन वसंत हेगडकर याच्याजवळ कल्याण मटका जुगार साहित्य व ४९० रुपये आढळून आले. पोलिसांनी जुगार साहित्य व रक्कम जप्त करून संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
हातगाड्यांवर शेगडीत अग्नी प्रज्वलित केला, दोघांविरुद्ध गुन्हा
उस्मानाबाद : परंडा येथील अविनाश घोरपडे व आप्पा मदने या दोघांनी २२ जानेवारी रोजी शहरातील सार्वजनिक ठिकाणी मानवी जीवितास धोका निर्माण होईल, अशा रीतीने आपआपल्या हातगाड्यांवरील शेगडीत अग्नी प्रज्वलित केला. यारून दोघांविरुद्ध परंडा ठाण्यात स्वतंत्र दोन गुन्हे नोंद झाले आहेत.