सोयाबीनच्या शेंगात बियाणांची फुगवणच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:31 IST2021-08-29T04:31:19+5:302021-08-29T04:31:19+5:30
तामलवाडी : महिनाभरापासून पावसाने हुलकावणी दिल्याने त्याचा फटका सोयाबीन पिकाला बसला आहे. तुळजापूर तालुक्यातील काटी मंडळ कृषी कार्यालयाअंतर्गत गावात ...

सोयाबीनच्या शेंगात बियाणांची फुगवणच नाही
तामलवाडी : महिनाभरापासून पावसाने हुलकावणी दिल्याने त्याचा फटका सोयाबीन पिकाला बसला आहे. तुळजापूर तालुक्यातील काटी मंडळ कृषी कार्यालयाअंतर्गत गावात १० हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयीबानच्या शेंगात बियाणांची फुगवण झाली नसल्याने त्याचा परिणाम सोयाबीन उत्पादनावर होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
काटी कृषी मंडळात ३० गावे येतात. यंदा २० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला. जोमाने पिकाची वाढ झाली. मात्र, ऐन फुल, फळधारणावेळी पावसाने उघडीप दिली. पाण्याअभावी अनेकांचे सोयाबीन जागेवर करपून गेले. शिवाय, पाणी नसल्याने १० हजार हेक्टर क्षेत्रांवरील सोयाबीनच्या झाडाला लागलेल्या शेंगात बियाण्याची फुगवण झाली नाही. त्याचा परिणाम पन्नास ते साठ टक्के उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे पेरणीसाठी केलेला खर्च तरी पदरात पडतो की नाही, याची चिंता शेतकऱ्याला लागली आहे.
चौकट.......
उडीद मुगाला चारच शेंगा
पाऊस गायब झाल्याने खरीप हंगामात पेरणी केलेल्या मूग, उडीद या पिकाची अवस्था वाईट झाली आहे. उडीद, मुगाच्या पिकाची वाढ मोठी झाली असली तरी त्यात अवघ्या चारच शेंगा लगडल्या. त्यामुळे ही दोन्ही पिके पूर्णत: वाया गेली असून, एकरी दोन क्विंटल उत्पादनही पदरात पडणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
चौकट
उत्पादनात ५० टक्के घट
पाऊस लांबल्याचा परिणाम खरीप पिकावर झाला. सोयाबीनच्या शेंगात बियाणाची फुगवण झाली नाही. उडीद, मुगाला तर चारच शेंगा लागल्या. त्यापण चोपट झाल्या. एकरी सहा क्विंटल निघणारे उडदाचे उत्पादन यंदा दोन क्विंटलवर आले. उत्पादनावर ५० टक्के परिणाम झाला असून, याची माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविली असल्याचे मंडळ कृषी अधिकारी आनंद पाटील यांनी सांगितले.
तोंडचा घास वाळला
साडेतीन एकर जमिनीत सोयाबीन पेरणीसाठी २५ हजार रुपये खर्च केला; परंतु, पावसाच्या हुलकावणीने सोयाबीन जाग्यावर करपू लागले. त्यातच झाडाला लागलेल्या शेंगाला बियाणाची फुगवण झाली नाही. त्यामुळे उत्पादन किती पदरात पडणार, याची शाश्वती नाही. शासनाने खरीप हंगामातील पीक विमा मंजूृर करून वाटप करावा.
- पांडुरंग सातपुते, शेतकरी, सांगवी (काटी).