सोयाबीनची मोंढ्यात ‘एन्ट्री’ होताच दर ‘पिछे मुड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST2021-09-22T04:36:17+5:302021-09-22T04:36:17+5:30
कळंब : एकीकडे सोयाबीनचं पीक फडात वाढत असतानाच दुसरीकडे मार्केटमध्ये सोयाबीनच्या दरात दरदिवशी वाढ होत होती. मात्र, यामुळे शेतकऱ्यांत ...

सोयाबीनची मोंढ्यात ‘एन्ट्री’ होताच दर ‘पिछे मुड’
कळंब : एकीकडे सोयाबीनचं पीक फडात वाढत असतानाच दुसरीकडे मार्केटमध्ये सोयाबीनच्या दरात दरदिवशी वाढ होत होती. मात्र, यामुळे शेतकऱ्यांत निर्माण झालेला हर्षोल्हास क्षणिक ठरला असून, शेतात ‘खळं’ सुरू होताच बाजारात सोयाबीनच्या दरात कमालीची घट झाली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात तब्बल ६० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन या प्रमुख पिकाची पेर झाली होती. प्रामुख्याने जूनच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात पेरणी झालेल्या या क्षेत्रातील बहुतांश पीक आता नव्वद दिवसांच्या कालावधीचे झाल्याने पक्वतेच्या टप्प्यावर आहे. यामुळे हळूहळू काढणी हंगाम आकारास येत आहे. शेतातील उभे पीक आता हिरव्या रंगाची कात टाकून देत पिवळसर दिसत आहे. एकूणच काड वाळत असल्याने काढणीची लगबग सुरू आहे. काढणी उरकलेले मळणी करत आहेत, तर मळणी झालेल्यांचे माल मोंढ्यात दाखल होत आहेत. यास्थितीत लहरी निसर्गाच्या तडाख्यातून हाती आलेले पीक बाजारात दाखल होताच घसरलेल्या दराने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. पेरणी झाल्यानंतर दराचा चढता आलेख राहिला होता. तो कायम राहील अन् यामुळे यंदा ‘मालामाल’ होऊ असा निर्माण झालेला आशावाद मात्र बाजारातील सध्याच्या घसरत्या दराने धुळीस मिळाला आहे.
चौकट...
आठ दिवसांपासून लागली घरघर
मागच्या आठ दिवसांत सोयाबीनच्या नव्या पिकाची आवक सुरू झाली आहे. यादरम्यान सोयाबीन जवळपास साडेआठ हजारांच्या आसपास विकले जात होते. यातच आवक हळूहळू वेग घेत असताना दर मात्र वेगाने घसरत होता. यात दरदिवशी पाचशेच्या आसपास घट नोंदली जात होती. यात शुक्रवार ते सोमवारच्या दरम्यान तर दीड-दोन हजारांचा झपका बसला. सोमवारच्या दरम्यान तर चक्क सहा हजारांच्या आत सोयाबीन घेतले जात होते.
दराची ‘नवलाई’ फोल ठरली...
यंदा आवक सुरू होताच काही मोंढ्यात मुहूर्ताचे दर दहा हजारांच्या पुढे गेले होते. साधारणपणे मागच्या पंधरवड्यात मार्केट ट्रेंड पण तसेच राहिले होते. वाढलेल्या दराची ही ‘नवलाई’ मोठ्या चर्चेचा विषय झाला होता. काही मोंढ्यातील उच्चांकी दर चांगलाच ‘फॉरवर्ड’ होत होता. मात्र, हा दर सद्यस्थितीत शेतकऱ्यांसाठी मृगजळच ठरत असल्याचे दिसून येत आहे. लोकमतने मागच्या आठवड्यातच ‘पिवळ्या सोन्यास झळाळी : पदरी पडेल की मृगजळ ठरेल‘ या आशयाचे दिलेले वृत्त वास्तवदर्शी ठरले असून, मालाची आवक सुरू होताच वेगाने झालेली घसरण शेतकऱ्यांना कोट्यवधींचा झपका देणारी ठरली आहे.