काढणी होताच उडदाचे दर घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:31 IST2021-08-29T04:31:23+5:302021-08-29T04:31:23+5:30
मुरुम : शहर व परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी उडदाची काढणी व मळणी सुरू केली आहे. मात्र, बाजारात अवघ्या पाच दिवसांतच ...

काढणी होताच उडदाचे दर घसरले
मुरुम : शहर व परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी उडदाची काढणी व मळणी सुरू केली आहे. मात्र, बाजारात अवघ्या पाच दिवसांतच प्रतिक्विंटल मागे उडदाचे दर एक हजार रुपयानी घसरल्याने अगोदरच आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आता दरामुळे फटका बसत आहे. शनिवारी मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीत उडदाला प्रतिक्विंटल ६ हजार ३०० ते ६ हजार ९५० रुपये दर होता.
मुरुम मंडळात जवळपास पाच हजार हेक्टरवर उडदाची पेरणी करण्यात आली आहे. सुरुवातीला पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांची उडीद काढणीला आली आहे. रोगराई आणि अपुऱ्या पावसामुळे यंदा उडदाचे उत्पन्न चक्क निम्म्यावर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणी आणि राशीसाठीचा लागवड खर्चही निघेनासा झाला आहे. सुरुवातीला कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक कमी असल्याने व उत्पन्न घटल्याने सोमवारपर्यंत उडदाला प्रतिक्विंटल ७५०० ते ७८०० रुपये दर मिळत होता. त्यामुळे परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी लवकर राशी करून चांगला भाव मिळविण्यासाठी धडपड सुरू केल्याचे दिसत होते. मागील दोन दिवसांपासून परिसरात अधूनमधून पाऊस होत असल्याने अनेकांच्या राशी पावसात अडकल्या आहेत. पावसात उडदाचे काड भिजल्याने शेतकऱ्यांना डबल लागवड खर्च करावा लागत आहे. दुसरीकडे पावसात भिजलेल्या उडदाचे दरही बाजारात क्विंटलमागे एक हजार रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. जसजशी बाजारात उडदाची आवक वाढत आहे, तसतसे दरही कमी होत आहेत. मागील वर्षी देखील परतीच्या पावसाने काढणीला आलेल्या उडदाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. यंदाही मागील वर्षाचीच पुनरावृत्ती होत असल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. आठ ते नऊ हजार रुपयापर्यंत उडदाला प्रतिक्विंटल दर मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
कोट.......
सध्या मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीत उडदाला प्रतिक्विंटल मागे हमीभावापेक्षा पाचशे रुपये जास्तीचा दर मिळत आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून पावसामुळे उडदाला मॉईश्चर आले आहे. उडीद भिजल्याने दर क्विंटल मागे पाचशे ते हजार रुपयांनी कमी झाले आहेत. चांगला माल बाजारात आल्यास दर पुन्हा वाढूही शकतात. शिवाय केंद्र सरकारने परदेशातून आयात सुरू केल्याने उडदाची मागणी घटल्याने शेतमालाचे दरही दिवसागणिक कमी-अधिक होत आहेत.
अमृत वरनाळे, आडत व्यापारी, मुरुम.