बहीण मदतीला धावली, पुरात अडकलेल्या तरुणाचा पोलीस, ग्रामस्थांच्या धाडसामुळे जीव वाचला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 16:15 IST2025-09-17T16:14:47+5:302025-09-17T16:15:58+5:30
पुरात अडकलेल्या भावाने फोन करताच बहीण मदतीला धावली, पोलीस अन् गावकऱ्यांनी 'पुलावर पाणी असूनही' जिवाची बाजी लावत वाचवले प्राण

बहीण मदतीला धावली, पुरात अडकलेल्या तरुणाचा पोलीस, ग्रामस्थांच्या धाडसामुळे जीव वाचला!
- संतोष वीर
भूम (धाराशिव): परांडा तालुक्यातील वाकडी पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका तरुणाचा जीव पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील कोळेकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून वाचविला. त्यांच्या या धाडसी कामगिरीमुळे एक मोठा अनर्थ टळला असून, सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
हनुमंत कांबळे हा तरुण १६ सप्टेंबर रोजी बार्शी येथे आपल्या बहिणीकडे गेला होता. पावसामुळे त्याने एक दिवस मुक्काम केला आणि १७ सप्टेंबर रोजी पहाटे साकत येथे जनावरांची धार काढण्यासाठी मोटारसायकलने निघाला. वाकडी फाट्यावर पोहोचल्यावर पुलावरून पाणी वाहत असल्याचे पाहून तो थांबला. मात्र, त्याला उशीर होत असल्यामुळे त्याने दुचाकी पाण्यातून नेण्याचा निर्णय घेतला. पुलाच्या मध्यभागी पोहोचताच त्याची मोटारसायकल बंद पडली आणि ती पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागली. त्याचबरोबर हनुमंत कांबळेही प्रवाहाच्या जोरदार लोंढ्यात सापडला. मात्र, त्याने समयसूचकता दाखवत तात्काळ जवळच्या चिलारीच्या झाडाचा आधार घेतला आणि स्वतःला वाचवले. त्यानंतर त्यांनी तातडीने बहिणीला फोन करून मदतीची याचना केली.
बहीण मदतीला धावली, गावकऱ्यांनी साथ दिली
बहिणीला घटनेची माहिती मिळताच ती आणि तिचा मेहुणा लगेचच पुलावर पोहोचले. त्यांना आपल्या भावाला पाहून हंबरडा फोडल्याने गावकऱ्यांचे लक्ष वेधले गेले. गावकरी तात्काळ घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील कोळेकर आणि शाबाज शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी गावातील राहुल कारभारी, अजित रगडे, विशाल लोंढे, अक्षय पाठक, श्रीराम जगताप आणि सुजित शिंदे यांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. वाहत्या पाण्यात वायरोप (दोरी) घेऊन त्यांनी हनुमंत कांबळे यांना सुरक्षित बाहेर काढले. सुमारे एक तास पाण्यात अडकल्यामुळे घाबरलेल्या हनुमंतला पोलीस व ग्रामस्थांनी धीर दिला आणि सुरक्षित त्याच्या गावाकडे पोहोचवले.
'पुलावर पाणी असूनही' जिवाची बाजी; पोलीस हेडकॉन्स्टेबल आणि गावकऱ्यांनी पुराच्या पाण्यातून वाचवला तरुणाचा जीव, धाराशिव जिल्ह्यातील वाकडी येथील थरारक घटना #dharashiv#marathwadapic.twitter.com/da0ze3CZld
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) September 17, 2025
पुलाची उंची वाढवण्याची मागणी
दरम्यान, १९७८ साली बांधलेला हा वाकडी पूल अनेक वर्षांपासून वाहतुकीच्या दृष्टीने गैरसोयीचा बनला आहे. गेल्या दोन वर्षांपासून मुसळधार पावसामुळे वारंवार पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प होते. भूम तालुक्यातील नागरिकांना बार्शी, पुणे, कोल्हापूर आणि मुंबईला जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. या घटनेनंतर पुलाची उंची वाढवून नवीन पूल बांधावा, अशी मागणी नागरिकांमधून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.