उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:37 IST2021-09-15T04:37:55+5:302021-09-15T04:37:55+5:30
तुळजापूर : शहरासह बाहेरगावाहून येणारे भाविक आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेचा भार असणाऱ्या येथील उपजिल्हा रुग्णालयात मागील पंधरा ...

उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा
तुळजापूर : शहरासह बाहेरगावाहून येणारे भाविक आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेचा भार असणाऱ्या येथील उपजिल्हा रुग्णालयात मागील पंधरा दिवसांपासून खोकल्याचे औषध, आमलपित्ताच्या गोळ्यांच्या तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत असून, ही औषधी तत्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविडमुळे बाह्य रुग्ण विभागाची ओपीडी संख्या घटली असली तरी सध्या सर्दी, ताप, खोकला या ‘व्हायरल ’ आजाराच्या रुग्णसंख्या वाढली आहे. दिवसभरात शंभर ते दीडशे बाह्य रुग्ण ओपीडी होत आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्ण, दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची उपचार घेण्यासाठी गर्दी असते. मात्र, रुग्णालयातील औषध वाटप विभागात खोकल्याच्या औषधांचा व आमलपित्ताच्या गोळ्यांचा साठा संपला असल्याने गरीब रुग्णांना स्वत: औषधे खरेदी करावी लागत आहेत.
तपासणीची ही सोय नाही
पावसाळ्यामुळे व वातावरणाच्या बदलामुळे तापाने फणफणलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, रुग्णांची तपासणी किंवा दाखल केल्यानंतर डेंग्यूची तपासणी करण्यासाठी डॉक्टर सांगतात. मात्र, रुग्णालयात डेंग्यू सदृश आजाराची तपासणी देखील होत नसल्याने रुग्णांना खासगी रक्त तपासणी लॅबमधून जवळपास ९०० ते १००० रुपये खर्च करून तपासणी करून घ्यावी लागत आहे.
कोविडमुळे गरीब नागरिकांच्या आर्थिक अडचणीत भर पडली असून, या रुग्णालयात येणारे रुग्ण हे गरीब कुटुंबातील असतात. रुग्णालयात खोकल्यासारखे औषध उपलब्ध होत नसल्याने गरीब, गरजू रुग्णाची गैरसोय होत आहे. खोकल्याचे औषध खासगी मेडिकलमधून घेणेही परवडत नाही.
- किसन देडे, रुग्ण
डेंग्यूची तपासणी आपल्याकडे होत नाही. तपासणी करण्याची किट दिली तर आम्ही करतोच. खोकल्याच्या औषधाची मागणी आम्ही केली आहे. परंतु, अद्याप ते उपलब्ध झाले नाही.
- डॉ. चंचला बोडके, वैद्यकीय अधीक्षक
130921\575620210913_120426.jpg
उपजिल्हा रुग्णालयाचा फोटो