धक्कादायक ! मुलींच्या जन्मदरामध्ये पुन्हा घसरण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST2021-09-22T04:36:53+5:302021-09-22T04:36:53+5:30
उस्मानाबाद -दर हजार मुलांमागे मुलींचे घटलेले प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र, तसेच राज्य शासनाकडून वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. २०१८-१९ ...

धक्कादायक ! मुलींच्या जन्मदरामध्ये पुन्हा घसरण...
उस्मानाबाद -दर हजार मुलांमागे मुलींचे घटलेले प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र, तसेच राज्य शासनाकडून वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. २०१८-१९ मध्ये त्याचे चांगले परिणाम दिसून आले. हे प्रमाण दर हजारी ९१४ वरून थेट ९६५ वर जाऊन ठेपले. मात्र, यानंतर पुन्हा मुलींच्या जन्मदरामध्ये झपाट्याने घसरण हाेऊ लागली आहे. तीन वर्षांत दर हजार मुलांमागे मुलींची संख्या ४८ ने कमी झाली आहे. हे चित्र शासन अन् प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययाेजनांवर प्रश्नचिन्ह लावणारे आहे.
वंशाच्या दिव्यासाठी मुलगाच हवा, हा अट्टहास कुटुंबीयांच्या मनातून बाहेर काढण्यासाठी शासनाकडून चांद्यापासून बांध्यापर्यंत जनजागृती केली जात आहे. एवढेच नाही तर ‘बेटी बचाव’सारखी महत्त्वाकांक्षी याेजना हाती घेण्यात आली. यानंतर तरी दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण वाढणे अपेक्षित हाेते, परंतु, त्यांच्या उलट झाले. प्रमाण वाढण्याऐवजी झपाट्याने घटत आहे. २०१७-१८ मध्ये जिल्ह्याचे लिंग गुणाेत्तर ९१४ एवढे हाेते. २०१८-१९ मध्ये ते थेट ९६५ वर जाऊन ठेपले हाेते. यानंतर हे प्रमाण आणखी वाढणे अपेक्षित हाेते. परंतु, त्यात माेठ्या गतीने घट हाेऊ लागली आहे. २०१९-२० मध्ये ९२८, तर २०२०-२१ मध्ये ९१७ पर्यंत खाली आले. मागील तीन वर्षांच्या तुलनेत दर हजार मुलांमागे मुलींची संख्या ४८ ने कमी झाली आहे. हे धक्कादाक वास्तव शासनासह स्थानिक प्रशासनाला आत्मचिंतन करायला लावणारे आहे. यात आता वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
चाैकट...
मुलींच्या जन्माची संख्या...
२०१७-१८ २२८९२
२०१८-१९ २४१६२
२०१८-२० २२४४२
२०२०-२१ २२०७२
हजार मुलांमागे मुली किती?
२०१६-१७ ९११
२०१७-१८ ९१४
२०१८-१९ ९६५
२०१९-२० ९२८
२०२०-२१ ९१७
लिंग निदानास बंदी
बहुतांश राज्यात पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा आहे. यातूनच मुलींचा गर्भ नाकारण्याची विकृती आली आहे. आपल्या पाेटी मुलगाच जन्माला यावा, अशी असंख्य दाम्पत्यांची इच्छा असते. मुलींचा गर्भ असेल तर गर्भपात करून स्त्री-भ्रूणहत्या केली जाते. हे प्रमाण वाढल्यानंतर सुरुवातीला २०१४ मध्ये ‘पीसीपीएनडीटी’ कायदा करण्यात आला. यानंतर २००३ मध्ये त्यात सुधारणा करण्यात आली. या कायद्यान्वये लिंग निदानास बंदी आहे. मात्र, आजही लपून-छपून बेकायदा गर्भपात हाेताहेत म्हणून की काय, दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण वाढण्याऐवजी कमी झाले आहे.
काेट...
जिल्ह्याचे लिंग गुणाेत्तर वाढावे यासाठी शासनाकडून विविध उपाययाेजना राबविल्या जात आहेत. काही तालुक्यांचे लिंग गुणाेत्तर वाढले आहे. मात्र, काही तालुक्यांत अद्याप म्हणावे तेवढे यश आलेले नाही. सध्या अशाच भागावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. येणाऱ्या काळात त्याचे चांगले परिणाम दिसतील.
-डाॅ. कुलदीप मिटकरी, अतिरिक्त जिल्हा आराेग्य अधिकारी, उस्मानाबाद.