सभापतीपदास शिवसेनेकडून नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:18 IST2021-02-05T08:18:09+5:302021-02-05T08:18:09+5:30
(फोटो : समीर सुतके) उमरगा : येथील नगर परिषदेत गुरूवारी विविध विषय समित्यांच्या निवडीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सत्ताधारी ...

सभापतीपदास शिवसेनेकडून नकार
(फोटो : समीर सुतके)
उमरगा : येथील नगर परिषदेत गुरूवारी विविध विषय समित्यांच्या निवडीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सत्ताधारी काँग्रेसला तीन, भाजपला एक तर राष्ट्रवादीला एका समितीवर सभापती देण्यात आले. ऐनवेळी सेनेने कोणत्याही समितीचे सभापती पद घेण्यास नकार दिला. उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर व नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी बांधकाम समितीचे सभापतीपद भाजपचे उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड यांच्याकडे पदसिद्धरित्या आले. तर सार्वजनिक पाणीपुरवठा समितीचे सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बालाजी पाटील, महिला, बालकल्याण व वाचनालय समितीचे सभापती पद काँग्रेसच्या संगीता औरादे, सार्वजनिक नियोजन, कर संकलन व शिक्षण समितीवर काँग्रेसचे वसीम शेख व सार्वजनिक आरोग्य व दिवाबत्ती समितीवर पुनश्च सविता वाघमारे यांची सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे. स्थायी समितीचे पदसिद्ध सभापतीपद नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे तर सदस्य म्हणून उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड व विषय समित्यावरील सर्व सभापती राहणार आहेत. तसेच स्वीकृत सदस्य म्हणून एम. ओ. पाटील व अरुण इगवे यांची निवड करण्यात आली आहे.
चौकट............
पालिकेतील सत्ताधारी काँग्रेस व भाजप व विरोधी पक्ष शिवसेना व राष्ट्रवादीचे बुधवारीच विषय समित्यांवर कोणाकोणाला किती व कोणास सभापतीपद द्यायचे यावर एकमत झाले होते. यानुसार सेनेला सार्वजनिक नियोजन, कर संकलन शिक्षण समितीचे सभापती पद देण्याचे ठरले होते. बुधवारी सेनेने यासाठी उमेदवारी अर्जही भरला होता. परंतु, त्यांनी एकही पद घेण्यास नकार दिला. उमेदवारी अर्ज भरूनही शिवसेनेने ऐनवेळी कोणत्याही समितीचे सभापती पद नाकारल्याने सत्ताधारी काँग्रेसकडे तीन, भाजप व राष्ट्रवादीचे प्रत्येकी एका विषय समितीवर सभापती बहुमताने निवड करण्यात आली.
फोटो- सभापती निवड झाल्यानंतर उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड व बालाजी पाटील यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित नगरसेवक व नागरिक.