रस्त्यावर मेंढरं साेडली, मंत्र्याचा पुतळा जाळला; एसटी आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक
By बाबुराव चव्हाण | Updated: September 13, 2023 17:16 IST2023-09-13T17:09:06+5:302023-09-13T17:16:25+5:30
अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

रस्त्यावर मेंढरं साेडली, मंत्र्याचा पुतळा जाळला; एसटी आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक
तेर (जि. धाराशिव) : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे उपोषण आंदाेलन सुरू आहे. या आंदाेलनाला पाठींबा देण्यासाठी बुधवारी तेर येथे समाज बांधवांनी रास्ताराेकाे आंदाेलन केले. यानंतर राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे समाजाचे लाेक उपोषणाला बसले आहेत. मात्र, या आंदाेलनाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, आरक्षणासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी काही समाजबांधव राज्याचे मंत्री विखे पाटील यांची भेट घेतली हाेती. यावेळी निवेदन देऊन त्यांच्या अंगावर भंडारा उधळला असता, सुरक्षारक्षक तसेच समर्थकांनी संबंधित समाजबांधवास बेदम मारहाण केली.
मारहाणीचा निषेध आणि आरक्षण मागणीसाठी बुधवारी तेर येथे धनगर बांधवांनी एकत्र येत रास्ताराेकाे आंदाेलन केले. तसेच मंत्री विखे पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून जाेरदार घाेषणाही दिल्या. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष सचिन देवकते, राष्ट्रवादी युवती कॉग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सक्षाणा सलगर, शिवाजी पडुळकर, आप्पासाहेब पडुळकर,रमेश लकडे, ग्रा. पं. सदस्य नवनाथ पसारे, अविनाश आगाशे, अजीत कदम, धनंजय आंधळे आदी उपस्थित हाेते.