तुळजापूर (जि. धाराशिव) : राज्यात मतपेट्यांचे काम सुरू असताना, त्यात शरद पवार यांनी त्यावेळी मोठ्या प्रमाणात घोटाळा केला. अशा पद्धतीने त्यांनी किती मतदारसंघांतील निवडणुका फिरवल्या, मला विचारा, मी सांगेन. मतदान, मोजणी प्रक्रियेत भानगडी करायच्या. त्याबदल्यात अनेक अधिकाऱ्यांना बक्षीस म्हणून चांगल्या पदावर नियुक्त्या द्यायच्या, हा त्यांचा इतिहास आहे. त्यामुळे त्यांना आता जे काही चालले आहे, ती भानगडच असल्याचे वाटते, असा दावा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोमवारी तुळजापुरातून केला.
मंत्री विखे-पाटील हे सोमवारी कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेतील कामांची पाहणी व भूमिपूजन सोहळ्यांसाठी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी तुळजापुरात माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, शरद पवारांनी ज्येष्ठता सोडली आहे. ती वयाने येत नसते. त्यांच्या काळात त्यांनी मत प्रक्रियेत अनेक भानगडी केल्या. १९९१ साली माझ्या वडिलांच्या निवडणुकीतही त्यांनी धांदली केली होती, असा आरोप विखे-पाटील यांनी केला.
राहुल गांधी यांच्यावर बोलताना ते म्हणाले, देशाला बदनाम करण्यासाठी त्यांनी विदेशात जाऊन टीका केली. लोकांनी दखल घेतली नाही. त्यामुळे आता पुन्हा देशात येऊन बदनामी करीत सुटले आहेत. खरेतर निवडणुकांमध्ये यश मिळत नसल्याने त्यांना वैफल्य आले आहे. यामुळे मतदारांचा अवमान करीत सुटले आहेत. त्यांनी मतदारांची माफी मागितली पाहिजे. लोकसभेला खोट्या प्रचाराच्या आधारावर त्यांना यश मिळाले. त्यांना यश मिळाले की घोटाळा नसतो, अपयश आल्यावरच घोटाळा दिसतो. एकीकडे देश वेगाने प्रगती करीत असताना लोकांचे लक्ष विचलित करण्याची त्यांना सवयच जडली असल्याचा दावाही विखे-पाटील यांनी केला.