अणदूर (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार, शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरचे संस्थापक सचिव सि.ना.आलुरे गुरूजी यांचे सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथील एका रुगणालयात उपचार सुरू असताना निधन झाले. आज दुपारी तीन नंतर त्यांच्या पार्थिवावर अणदूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विटरवरुन गुरुजींच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
तुळजापूर तालुका व मराठवाड्यात शेती, सहकार, शिक्षण या क्षेत्रांमध्ये सेवा आणि सचोटीचा आदर्श निर्माण करत भरीव कार्य करणारे सिद्रमप्पा आलुरे गुरूजी यांच्या निधनाने एक कर्तृत्वनिष्ठ नेतृत्व आपण गमावले आहे. आयुष्यभर ज्ञानाची उपासना करणार्या आलुरे गुरुजींना भावपूर्ण श्रद्धांजली!, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.