लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू दागिने घेऊन भुर्रर्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST2021-09-22T04:36:55+5:302021-09-22T04:36:55+5:30
उस्मानाबाद : सध्याच्या काळात विवाह जुळविणे जाेखमीचे झाले आहे. लग्न जुळविण्याच्या जुन्या पद्धती काळानुरूप मागे पडू लागल्या आहेत. त्यानुसार ...

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू दागिने घेऊन भुर्रर्र
उस्मानाबाद : सध्याच्या काळात विवाह जुळविणे जाेखमीचे झाले आहे. लग्न जुळविण्याच्या जुन्या पद्धती काळानुरूप मागे पडू लागल्या आहेत. त्यानुसार फसवणुकीचे प्रकारही डाेके वर काढत आहेत. असाच अनुभव अंबी येथील एका तरुणास आला. दाेन दिवसांपूर्वी माेजक्या लाेकांच्या उपस्थितीत विवाह पार पडल्यानंतर नवविवाहिता दागिन्यांसह पसार झाली. अंबी पाेलिसांनी तपासाची चक्रे फिरवित नांदेडातून नववधूसह चाैघांना बेड्या ठाेकल्या. तसेच लग्नामध्ये घातलेले दागिनेही त्यांच्याकडून जप्त करण्यात आले.
भूम तालुक्यातील अंबी येेथील विश्वनाथ भाेसले या तरुणाचा विवाह नांदेड येथील एका तरुणीसाेबत १८ सप्टेंबर राेजी माेजक्या लाेकांच्या उपस्थितीत झाला हाेता. या नववधूस सासरच्या मंडळीने बऱ्यापैकी दागिने घातले हाेते. दुसऱ्या दिवशी लघुशंकेच्या बहाण्याने संबंधित नववधू दागिन्यांसह तिच्या तीन सहकाऱ्यांच्या मदतीने पसार झाली. नववधू घरी नसल्याचे लक्षात आल्यानंतर सासरच्या मंडळीने तातडीने अंबी पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून नववधूसह चाैघांविरुद्ध भादंसंचे कलम ४०६, ४२०, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल झाला हाेता. यानंतर अंबी ठाण्याचे सपाेनि आशिष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाेहेकाॅ पाटील, पाेना लक्ष्मण माने, सिध्देश्वर माने, सिध्देश्वर शिंदे, पाेकाॅ सतीश राऊत, रामकिशन कुंभार आदींच्या पथकाने तपासाची चक्रे फिरविली. या माध्यमातून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बनावट नववधू पूजा ओढणे, आप्पा भांगे, सुभम दवणे व नारायण साेनटक्के अशा चाैघांना नांदेड येथून अटक करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून विवाहातील दागिनेही जप्त केले. प्रकरणाचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.