तीस कर्मचाऱ्यांमार्फत अपात्र शिधापत्रिकांचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:35 IST2021-02-09T04:35:02+5:302021-02-09T04:35:02+5:30
लोहारा : सार्वजनिक धान्य वितरणप्रणालीतील अनियमिता आणि गळती रोखण्यासाठी राज्य शासनाकडून कडक अंमलबजावणी केली जात आहे. त्या अनुषंगाने तालुक्यात ...

तीस कर्मचाऱ्यांमार्फत अपात्र शिधापत्रिकांचा शोध
लोहारा : सार्वजनिक धान्य वितरणप्रणालीतील अनियमिता आणि गळती रोखण्यासाठी राज्य शासनाकडून कडक अंमलबजावणी केली जात आहे. त्या अनुषंगाने तालुक्यात १२ फेब्रुवारी ते ३० एप्रिल या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांची शोधमोहीम राबविण्यात येत असून, यासाठी तीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
तालुक्यात एकूण .......... शिधापत्रिकाधारक असून, या मोहिमेदरम्यान बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्वच शिधापत्रिकांची कोटकोरपणे तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी अव्वल कारकून, मंडल अधिकारी, तलाठी व लिपिक यांची मदत घेतली जाणार आहे. तसेच तपासणीअंती शिधापत्रिकांची दोन गटांत विभागणी केली जाईल. यात एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या छाननीनंतर पुरेसा पुरावा असलेल्यांची यादी ‘गट-अ’ म्हणून केली जाईल. तर ‘गट-ब’मध्ये पुरेसा पुरावा न देणाऱ्यांची नोंद घेतली जाणार आहे. ‘गट अ’मधील शिधापत्रिकाधारकांची शिधापत्रिका पूर्ववत चालू राहील. मात्र, गट बमधील शिधापत्रिका निलंबित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गट ब यादीमधील निलंबित केलेल्या शिधापत्रिकाधारकांना पुन्हा पंधरा दिवसांची मुदत देऊन त्या कालावधीत त्यांनी त्या भागात राहात असल्याबाबतचा सबळ पुरावा देणे आवश्यक आहे. मुदतीत हा पुरवा नाही दिल्यास त्यांची शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सदरील कार्यवाही एक महिन्यात पूर्ण करावयाची असल्याचे पुरवठा विभागातील लिपिक बालाजी चामे यांनी सांगितले.
संशयास्पद पुराव्यांची पोलिसांमार्फत चौकशी
पुराव्यामध्ये छाननी करताना संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत पोलिसांमार्फत तपासणी करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, दुबार, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती, स्थलांतरित व्यक्ती, मयत व्यक्ती या लाभार्थींना वगळणच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
‘त्या’ शिधापत्रिका ठरणार अपात्र
शिधापत्रिकांची तपासणी करतेवेळी एकाच पत्त्यावर दोन शिधापत्रिका असणार नाहीत यादी दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसचे शसकीय, निमशासकीय, कार्यालयातील कर्मचारी, खासगी कंपन्यांमधील कर्मचारी/कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असल्यास अशांच्या शिधापत्रिका तत्काळ अपात्र ठरवण्यात येणार आहेत.