बायोडिझेलच्या नावाखाली भेसळयुक्त इंधन विक्री तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:35 IST2021-09-26T04:35:44+5:302021-09-26T04:35:44+5:30

उमरगा : डिझेलपेक्षा वीस ते तीस रुपये स्वस्त बायोडिझेल मिळत असल्यामुळे अनेक वाहनधारक या इंधनाचा वापर करत आहेत. परंतु, ...

Sales of adulterated fuels under the name of biodiesel boom | बायोडिझेलच्या नावाखाली भेसळयुक्त इंधन विक्री तेजीत

बायोडिझेलच्या नावाखाली भेसळयुक्त इंधन विक्री तेजीत

उमरगा : डिझेलपेक्षा वीस ते तीस रुपये स्वस्त बायोडिझेल मिळत असल्यामुळे अनेक वाहनधारक या इंधनाचा वापर करत आहेत. परंतु, बायोडिझेलच्या नावाने विविध इंधनांची भेसळ करुन त्याच्या विक्रीचा नवा गोरखधंदा महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील उमरगा तालुक्यात फोफावत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात जवळपास ३० ते ४० ठिकाणी अशा इंधनाची विक्री होत असून, यातून इंधनापोटी मिळणाऱ्या कोट्यवधीच्या महसूलावर शासनाला पाणी सोडावे लागत आहे.

उमरगा तालुक्यात २२ पेट्रोल पंप असून, या पंपावरून पूर्वी महिन्याला सुमारे ४४ लाख लिटर डिझेल विक्री होत होती. सध्या ही विक्री १० लाख लिटरपर्यंत खाली आली आहे. यावरून सुमारे ३४ लाख लिटर भेसळयुक्त बायोडिझेल विक्री होत असल्याचे सिद्ध होत आहे. उमरगा हा भाग कर्नाटक व आंध्रप्रदेशाच्या सीमेजवळ आहे. त्या दोन राज्यात तेथील सरकारने अशा बनावट डिझेल विकीला बंदी घातली आहे. त्यामुळे तेथील अवैध धंदेवाल्यांनी आता उमरगा भागात स्थानिकांना हाताशी धरून हा काळा धंदा सुरू केला आहे. जकेकूर चौरस्ता येथील औद्योगिक वसाहतीत अनेक प्लाॅटधारकांच्या मालकीच्या जागेत या माफीयानी ही बनावट डिझेल विकी सुरु केली आहे. दिवसभर अनेक टँकर उघडपणे रस्त्यावर उभे राहून याची विक्री करतात. उत्पादन शुल्क विभागाने दोन महिन्यांपूर्वी या ठिकाणी धाड घातली. मात्र, त्यापूर्वीच या माफीयांना याबाबत सुगावा लागला होता. तुरोरी व तलमोड, खसगी सीमाभागात हा धंदा उघडपणे सुरू आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात बायोडिझेलसाठी अद्याप एकही पंप कार्यान्वित नाही. त्याचाच गैरफायदा घेऊन अवैधरित्या बायोडिझेल काळ्या बाजारात चालू आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ असलेल्या धाकटीवाडी जाणाऱ्या रस्त्यावर एका ट्रक (क्र. के. ए. ३३/ ७९३२) या टँकरमधील अनधिकृत बायोडिझेल भरत असल्याची माहिती उमरगा महसूल विभागाला मिळाल्यानंतर त्यांच्या पथकाने धाड टाकून १० हजार लिटर बायोडीझेल, टँकर जप्त करून पोलीसांच्या ताब्यात दिले होते. या बनावट डिझेलमुळे वाहनाच्या इंजिनमध्ये बिघाड होत आहे. यासोबतच शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूलही बुडत आहे.

चौकट.....उमरगा तालुक्यात अनधीकृत बायोडिझेल विक्री करणाऱ्यावर नुकतीच कारवाई करून १० हजार लिटर बायोडिझेल जप्त करण्यात आले आहे. यापुढील याबाबतची माहिती उमरगा महसूल विभागाला मिळाल्यास पथक सदरील ठिकाणी धाड घालून कडक कारवाई करेल.

- राहुल पाटील, तहसीलदार, उमरगा

Web Title: Sales of adulterated fuels under the name of biodiesel boom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.