आठवलेंचा इरादा पक्का,लोकसभेसारखे विधानसभेतही रिपाइं महायुतीसोबतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 13:31 IST2019-05-13T13:30:58+5:302019-05-13T13:31:48+5:30
राज्यात भाजप-सेना महायुतीला किमान ३७ ते ३८ जागा मिळतील.
आठवलेंचा इरादा पक्का,लोकसभेसारखे विधानसभेतही रिपाइं महायुतीसोबतच
उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप-सेना महायुतीला किमान ३७ ते ३८ जागा मिळतील. आगामी विधानसभा निवडणूकही एकत्रच लढण्याचे ठरले आहे. त्यामुळे याही निवडणुकीत आम्हीच सत्तेवर येऊ, असा ठाम विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री खा. रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
दुष्काळ पाहणीसाठी रविवारी उस्मानाबादच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खा. आठवले म्हणाले, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थापाड्या म्हटले नाही. मागील पाच वर्षात मोदी सरकारने बरीच कामे केली आहेत. जनतेने आणखी पाच वर्ष सेवा करण्याची संधी दिल्यास अपूर्ण कामे पूर्ण करतील, असे म्हटले होते. परंतु, प्रसारमाध्यमांनी माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. भाजप-शिवसेना महायुतीने लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढविली.
२०१४ च्या तुलनेत यावेळी तीन-चार जागा कमी झाल्या तरी आम्ही किमान ३७ ते ३८ जागा जिंकू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणूकही भाजप-सेनेने एकत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. महायुतीमध्ये रिपाइं, रासप, शिवसंग्राम आदी मित्रपक्ष सोबत असतील. त्यामुळे याही निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला यश मिळणार नाही. महायुतीच पुन्हा सत्तेत येईल, असे मत त्यांनी मांडले. तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी या गावाला भेट देऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रश्न जाणून घेतले.