दोन एकर कोथिंबिरीच्या शेतात फिरविले रोटाव्हेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:37 IST2021-08-17T04:37:56+5:302021-08-17T04:37:56+5:30

जेवळी : लोहारा तालुक्यातील जेवळी येथील एका शेतकऱ्याने कोथिंबिरीची विक्री होत नसल्याने वैतागून दोन एकर कोथिंबीर पिकात चक्क रोटाव्हेटर ...

Rotavator rotated in a two acre cilantro field | दोन एकर कोथिंबिरीच्या शेतात फिरविले रोटाव्हेटर

दोन एकर कोथिंबिरीच्या शेतात फिरविले रोटाव्हेटर

जेवळी : लोहारा तालुक्यातील जेवळी येथील एका शेतकऱ्याने कोथिंबिरीची विक्री होत नसल्याने वैतागून दोन एकर कोथिंबीर पिकात चक्क रोटाव्हेटर फिरविला. त्यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.

महिनाभरापासून या परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे उडीद, मूग आणि सोयाबीन पीक रानातच करपून गेले आहे. अशा परिस्थितीत पालेभाज्यांनाही अपेक्षित भाव मिळेनासा झाला आहे. कोथिंबिरीची विक्री होत नसल्याने दक्षिण जेवळी येथील शेतकरी दत्तात्रय होनाजे या शेतकऱ्याने दोन एकर क्षेत्रातील कोंथिबीर पिकावर चक्क रोटाव्हेटर फिरविले असून, यामुळे या शेतकऱ्याला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.

शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी वैतागून गेले आहेत. मुंबई बाजारपेठ बंद असून, हैदराबाद बाजारपेठेत भरपूर कोथिंबीर आहे. पुणे बाजारपेठेमध्ये आपला माल जात नाही. नागपूर बाजारपेठेत विक्री करणे परवडत नाही, अशी विविध कारणे सांगून शेतकऱ्यांकडून कमी दराने खरेदी केली जात आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

कोट.......

बाजारपेठेत कोथिंबिरीच्या कॅरेटला गेल्या आठवड्यात चारशे ते पाचशे रुपये कॅरेटचा दर मिळाला होता; परंतु व्यापाऱ्यांनी कोथिंबीर प्लांट पाहण्यासाठी आज येतो, उद्या येतो असे म्हणून एक आठवडा विलंब केला. या एका आठवड्यात एका कॅरेटचा दर तीस चाळीस रुपयावर आला आहे. एकरी पन्नास हजार रुपये उत्पन्न अपेक्षित असताना ते चार-पाच हजार रुपयांवर आले आहे. व्यापाऱ्यांनी केलेल्या टाळाटाळीमुळे मला लाखोंचा फटका सहन करावा लागला.

- दत्तात्रय होनाजे, शेतकरी, जेवळी

Web Title: Rotavator rotated in a two acre cilantro field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.