पीक विम्याबाबत कृषिमंत्र्यांच्या निर्णयानंतर भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:29 IST2021-01-22T04:29:50+5:302021-01-22T04:29:50+5:30
उस्मानाबाद : पीक विम्यासंदर्भात कृषिमंत्र्यांनी सर्व बाबींची सखोल माहिती घेऊन दोन दिवसांत निर्णय घेण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या ...

पीक विम्याबाबत कृषिमंत्र्यांच्या निर्णयानंतर भूमिका
उस्मानाबाद : पीक विम्यासंदर्भात कृषिमंत्र्यांनी सर्व बाबींची सखोल माहिती घेऊन दोन दिवसांत निर्णय घेण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयानंतर भारतीय जनता पार्टी आपली पुढील दिशा ठरविणार असून, वंचित शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी व्यक्त केला आहे.
ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले अधिकांश बाधित शेतकरी तांत्रिक कारणामुळे पीकविम्याच्या हक्काच्या नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. या संदर्भात राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे १२ जानेवारी रोजी केली होती. दरम्यान, भुसे हे आजारी असल्यामुळे याबाबत काही निर्णय होऊ शकला नव्हता. सदर विषयाबाबत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची मंत्रिमहोदयांसोबत चर्चा झाली असून, या अनुषंगाने सर्व बाबींची सखोल माहिती घेऊन दोन दिवसांत भूमिका जाहीर करण्याचे आश्वासन मंत्री दादाजी भुसे यांनी दिले असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
चौकट........
विमा कंपनीने २४, ऑक्टोबरनंतर आलेले अर्ज गृहीत न धरण्याची भूमिका घेतली होती. याबाबत कृषी आयुक्त व विमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर उशिराने आलेले अर्ज ग्राह्य धरत अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसानीच्या अनुषंगाने रक्कम वर्ग करण्यात येत आहे; परंतु बहुतांश शेतकरी अर्जच करू न शकल्याने ते नुकसानभरपाईपासून वंचित राहत आहेत. या शेतकऱ्यांना विमा मिळावा या अनुषंगाने कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे तांत्रिक दोष निदर्शनास आणून देत याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
खरीप २०१९ मध्ये अशीच परिस्थिती असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमा कंपन्यांना सरसकट मदत करण्यास बाध्य केले होते, ही बाबदेखील कृषिमंत्र्यांना अवगत केली. कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन सर्व शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळवून देतील, अशी अपेक्षा असल्याचेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे.