रोचकरीची रवानगी पोलिसांच्या कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:37 IST2021-08-20T04:37:12+5:302021-08-20T04:37:12+5:30
उस्मानाबाद / तुळजापूर : तुळजापुरातील मंकावती तीर्थकुंड हडप केल्याचा आराेप असलेल्या रोचकरी बंधूंना ताब्यात घेतल्यानंतर गुरुवारी त्यांना न्यायालयासमोर हजर ...

रोचकरीची रवानगी पोलिसांच्या कोठडीत
उस्मानाबाद / तुळजापूर : तुळजापुरातील मंकावती तीर्थकुंड हडप केल्याचा आराेप असलेल्या रोचकरी बंधूंना ताब्यात घेतल्यानंतर गुरुवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. पोलिसांनी अन्य आरोपींच्या तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याची विनंती केल्यानंतर दोन्ही आरोपींना सोमवारपर्यंत ही पोलिसांच्याच कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
तुळजापूर शहरातील प्राचीन तीर्थकुंड आपल्या मालकीचा असल्याचे सांगत बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर कब्जा मारल्याचा व अवैधरित्या बांधकाम करून ऐतिहासिक वारश्याची दुर्गती केल्याचा आरोप देवानंद रोचकरी व बाळासाहेब रोचकरीवर आहे. याआधारे १० ऑगस्ट रोजी या दोघांवर तुळजापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपी पसार झाले होते. दरम्यान, देवानंद रोचकरीला बुधवारी पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले. त्यानंतर दुसरा आरोपी बाळासाहेब रोचकरी हा गुरुवारी पहाटे स्वत: पोलिसात हजर झाला. त्यालाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळीच या दोघांनाही पोलीस निरीक्षक अजिनाथ काशिद यांनी फौजफाट्यासह तुळजापूरच्या न्यायालयात हजर केले. गर्दीची शक्यता लक्षात घेऊन न्यायालय परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर याप्रकरणात त्यांना मदत करणाऱ्या अन्य आरोपींचा माग काढण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. त्यावर न्यायालयानेही दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
आणखी कोण अडकणार...
तीर्थकुंडावर कब्जा करण्यापूर्वी रोचकरी बंधूंनी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. ही कागदपत्रे तयार करून देण्यात व तीर्थकुंडावर मालकी लावून देण्यात प्रशासनातील कोणत्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली व ती कशी केली, याचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. यामुळे आता तत्कालीन भूमी अभिलेख तसेच नगर परिषदेतील अधिकारी-कर्मचारीही रडारवर येण्याची शक्यता आहे.