चाकूचा धाक दाखवून डॉक्टरच्या घरी जबरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:38 IST2021-09-24T04:38:28+5:302021-09-24T04:38:28+5:30

येडशी (जि. उस्मानाबाद) : येथील एका डॉक्टरच्या घरात प्रवेश करुन त्यांच्या पत्नीस चाकूचा धाक दाखवीत जबरी चोरी केल्याची घटना ...

Robbery at a doctor's house in fear of a knife | चाकूचा धाक दाखवून डॉक्टरच्या घरी जबरी चोरी

चाकूचा धाक दाखवून डॉक्टरच्या घरी जबरी चोरी

येडशी (जि. उस्मानाबाद) : येथील एका डॉक्टरच्या घरात प्रवेश करुन त्यांच्या पत्नीस चाकूचा धाक दाखवीत जबरी चोरी केल्याची घटना गुरुवारी पहाटे येडशी येथे घडली आहे. या घटनेत रोकड व दागिने असा ९ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला असून, ग्रामीण ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला.

येडशी येथील गणेशनगर भागात मुख्य रस्त्यावर डॉ. सतीश जेवे व विद्या जेवे यांचे धन्वंतरी क्लिनिक आहे. याच क्लिनिकच्या दुस-या मजल्यावर जेवे कुटुंबीय वास्तव्यास आहे. गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी जिन्याच्या दरवाजास बाहेरून बाजूने असलेला पत्रा काढून दरवाजा उघडला. यानंतर दुस-या मजल्यावर डॉ. यांच्या घरात प्रवेश केला. बेडरूमकडे त्यांनी मोर्चा वळवून तेथे निद्राधीन असलेल्या जेवे यांना उठवून त्यांना चाकू व रॉडचा धाक चोरट्यांनी दाखविला. घरातील रोकड, दागिने देण्यासाठी त्यांनी धमकावले. त्यामुळे घाबरलेल्या जेवे यांनी ६ लाखांची रोकड, १७ तोळे सोने तसेच काऊंटरमधील १० हजार रुपयेही काढून दिले. यानंतर चोरट्यांनी हा मुद्देमाल घेऊन तेथून पळ काढला. या घटनेत एकूण ९ लाख १६ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.

पोलिसांची धाव...

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर श्वान पथक, फाॅरेन्सिक पथक, पोलीस निरीक्षक साबळे व हिना शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यानंतर उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे करीत आहेत.

गस्त वाढविणे गरजेचे...

येडशी येथे दररोज उस्मानाबाद ग्रामीण पोलीस रात्रीची गस्त घालत असतात. तरीही चो-या थांबत नाहीत. मागील २० जुलै रोजीच चार ठिकाणी चोरी होऊन मारहाणीची घटनाही घडली होती. किरकोळ चोरीचे प्रयत्न सातत्याने होत आहेतच. त्यामुळे नव्या अधिका-यासमोर चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे.

Web Title: Robbery at a doctor's house in fear of a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.