रस्ते रुतले गाळात, डागडुजीसाठी नागरिकांचे धाराशिव पालिकेवर चिखलफेक आंदोलन
By सूरज पाचपिंडे | Updated: July 10, 2023 17:35 IST2023-07-10T17:34:45+5:302023-07-10T17:35:30+5:30
मागील आठ ते दहा महिन्यांपासून शहरातील विविध भागात भूमिगत गटाराची कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक भागातील रस्ते उखडले आहे.

रस्ते रुतले गाळात, डागडुजीसाठी नागरिकांचे धाराशिव पालिकेवर चिखलफेक आंदोलन
धाराशिव : शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटारीच्या कामामुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्ते उखडले आहेत. परिणामी रस्त्यावर चिखल होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुले, वयोवृध्द व्यक्ती तसेच दुचाकीस्वार रस्त्यावरून घसरून पडत आहेत. असे असतानाही पालिकेकडून रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने संतापलेल्या नागरिकांनी सोमवारी धाराशिव नगरपालिकेसमोर चिखल फेकून आंदोलन केले.
मागील आठ ते दहा महिन्यांपासून शहरातील विविध भागात भूमिगत गटाराची कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक भागातील रस्ते उखडले आहे. मात्र, त्यानंतर रस्त्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही. परिणामी, पावसाळ्यात रस्ते चिखलमय होत आहेत. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. वयोवृध्द व्यक्ती व बालके रस्त्यावरून घसरून पडत आहेत. दुचाकीस्वारांना दुचाकी चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. दुचाकीही घसरून अपघात घडत आहेत.
नारायण कॉलनी, गालीबनगर, शिरीन कॉलनी, निजामोद्दीन कॉलनी, रझा कॉलनी, सुलतानपुरा, शाहूनगर, संभाजीनगर, वृंदावन कॉलनी या भागातील रस्त्यांची अंत्यत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांनी सोमवारी नगरपालिकेसमोर एकत्र येत चिखलफेक आंदोलन केले. यावेळी रस्त्यावर त्वरित मुरुम टाकून दबाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. आंदोलनात शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रशांत साळुंके यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.