कळंबमध्ये ठिकठिकाणी रोडरोमिओंचे कट्टे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:40 IST2021-09-16T04:40:57+5:302021-09-16T04:40:57+5:30
कळंब : सणासुदीच्या काळात बाजारपेठेत गर्दी वाढली असताना रोडरोमिओंनाही बहर आला आहे. अनेक ठिकाणी टोळक्याने बसून छेडछाडीचे प्रकार घडत ...

कळंबमध्ये ठिकठिकाणी रोडरोमिओंचे कट्टे...
कळंब : सणासुदीच्या काळात बाजारपेठेत गर्दी वाढली असताना रोडरोमिओंनाही बहर आला आहे. अनेक ठिकाणी टोळक्याने बसून छेडछाडीचे प्रकार घडत आहेत. त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता मोहीम हाती घेण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून कळंबची बाजारपेठ ओळखली जाते. सध्या सणासुदीच्या खरेदीसाठी महिलावर्गाची गर्दी वाढली आहे. बसस्थानक, मुख्य बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, ढोकी रोड या भागात सध्या टवाळखोरांचा राबता वाढला आहे. बसस्थानकावर पोलीस चौकी आहे, पण पोलीस कर्मचारी तेथे नियमित उपस्थित राहत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज चौक भागात पूर्वी पोलीस चौकी बसविण्यात आली होती. रस्ता कामात ती हटविण्यात आल्याने त्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे या भागात रोडरोमिओंवर कोणाचाही वचक नसल्याचे दिसून येते.
चौकट......
या भागात वाढला उपद्रव
अहिल्यादेवी होळकर चौकात तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर चौक भागात हातगाडे, वाहने अस्ताव्यस्त उभी राहतात. देवी रोड भागात भाजी विक्रेत्यांनी अर्धा रस्ता व्यापला आहे. त्यामुळे येथे खरेदी करताना विचित्र अनुभव महिला वर्गाला येतात. ‘त्या’ मंडळींवर कोणाचा वचक राहिला नसल्याने या भागात टवाळखोर मंडळींचा उपद्रव वाढल्याचे चित्र आहे.
कोरोना परिस्थितीमुळे शाळा, महाविद्यालयातील उपस्थिती मंदावली आहे. खासगी शिकवणीवर्गही मोजक्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होत असल्याने साधारणपणे छेडछाडीसाठी तिकडे ॲक्टिव्ह असणारी मंडळी आता बाजारपेठेत कार्यरत झाल्याचे चित्र आहे.
चौकट -
टवाळखोराविरुद्ध येथे करा तक्रार
शहरात छेडछाडीच्या घटना होत असेल तर कोणीही थेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करू शकतो. यासाठी ठाण्यात दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचारी कायम उपलब्ध राहतात. अशा घटना कोणाच्या निदर्शनास आल्या तर पोलीस ठाण्यात फोन करूनही माहिती दिली तर त्याची दखल घेतली जाते. शाळा, महाविद्यालय, शिकवणी वर्ग प्रमुख यांनाही अशा घटना घडत असल्यास पोलिसांना कळविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
चौकट -
काय आहे दामिनी पथक?
पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या छेडछाडीच्या तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनावर आळा बसावा यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारी सहभागी असलेल्या दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. महिलांनी बिनदिक्कतपणे अशा घटनाबाबत तक्रारी करण्यासाठी पुढे यावे यासाठी हे पथक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
कोट........
सध्या शाळा, महाविद्यालये बंद असल्याने छेडछाडीच्या घटनांच्या तक्रारीच्या घटल्या असाव्यात. परंतु, सणासुदीमुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत गर्दी आहे. त्यामुळे बाजारपेठेत आम्ही आता गर्दीच्या वेळेस टवाळखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी दामिनी पथकातील पोलीस कर्मचारी तैनात करणार आहोत. शुक्रवारपासून मुख्य बाजारपेठेत विविध ठिकाणी हे कर्मचारी गर्दीचा फायदा घेऊन चुकीची कामे करणाऱ्यांना पकडतील.
- यशवंत जाधव, पोनि