नदी, नाले, ओढ्यांना आला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:35 IST2021-09-27T04:35:30+5:302021-09-27T04:35:30+5:30

काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील काक्रंबासह परिसरातील खंडाळा, वडगाव (ला), व्होनाळा, बारूळ, जवळगा (मे), वानेगाव, सलगरा, किलज, देवसिंगा, गंधोरा, हंगरगा ...

Rivers, streams, streams flooded | नदी, नाले, ओढ्यांना आला पूर

नदी, नाले, ओढ्यांना आला पूर

काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील काक्रंबासह परिसरातील खंडाळा, वडगाव (ला), व्होनाळा, बारूळ, जवळगा (मे), वानेगाव, सलगरा, किलज, देवसिंगा, गंधोरा, हंगरगा (तुळ) येथे गेल्या चार दिवसांपासून दररोज जोरदार पाऊस पडत आहे. शनिवारी रात्रीही जवळपास तीन तास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नदी, नाले, ओढ्यांना पूर आला असून, काढणीस आलेल्या सोयाबीन पिकासह, कांदा, उडीद, मूग आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास शनिवारच्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने हिरावून घेतल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

जून महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी उसनवारी, व्याजाने पैसे काढून काळ्या आईची ओटी भरली. कोवळी पिके जोमदार दिसत असताना पावसाने जवळपास २० ते २५ दिवस दडी मारल्याने कोवळी पिके माना टाकू लागली होती;मात्र मध्यंतरी झालेल्या हलक्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले; मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने ओढ दिली. यामुळे उत्पादनावर परिणाम होणार हे दिसत असताना सोयाबीनचा दरही दहा हजारांवर पोहोचला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; मात्र गेल्या आठ दिवसात सोयाबीनचा भाव पाच हजारांवर आल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा झाली होती. त्यातच आता निसर्गाचे अस्मानी संकट ओढवल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे.

दरम्यान, या भागात कांदा लागवडही मोठ्या प्रमाणात केली आहे. कांद्याचे फडच्या फड शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने वाहून गेले. यामुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून विमा मंजूर करावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

260921\img-20210926-wa0101.jpg

काक्रंबा परिसरात सोयाबीन पिकासह कांदा पिकाचे फडफड वाहून गेले चे दिसत आहे.

Web Title: Rivers, streams, streams flooded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.