जिल्ह्यात १४९१ व्यवसाय सुरू करण्याचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:38 IST2021-09-15T04:38:31+5:302021-09-15T04:38:31+5:30
उस्मानाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील १४९१ नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार उद्योग, तसेच व्यवसाय सुरू करून देण्याचा संकल्प ...

जिल्ह्यात १४९१ व्यवसाय सुरू करण्याचा संकल्प
उस्मानाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील १४९१ नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार उद्योग, तसेच व्यवसाय सुरू करून देण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने केला आहे, अशी माहिती भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
कोविड महामारी व त्यामुळे उद्भवलेल्या जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर देशातील कोणताही व्यक्ती उपाशी राहू नये, या उद्देशाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेत देशातील जवळपास ८० कोटींहून अधिक जनतेला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत दरमहा ५ किलो मोफत धान्य देण्याचे अभियान राबविले. कोविडच्या पहिल्या लाटेत सुरू करण्यात आलेली ही योजना पुढे दुसऱ्या लाटेतही कायम ठेवून येणारी दिवाळी म्हणजे नोव्हेंबर, २०२१ पर्यंत राबविण्याची घोषणा केली आहे, तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ ही केवळ घोषणाच न करता अनेक योजना जाहीर करत त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आर्थिक तरतूद केलेली आहे. दरम्यान, १२ सप्टेंबर राेजी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे शक्तिकेंद्र व बूथप्रमुख यांच्या ऑडिओब्रिजद्वारे झालेल्या बैठकीत प्रत्येक बूथमधील किमान एका नागरिकाला त्याच्या गरजे व इच्छेनुसार उद्योग तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करण्याचा निर्णय झाला. प्रधानमंत्री स्वनिधी, ई-मुद्रा, कृषीवर आधारित उद्योग, एमएसएमई, डीआयसीमार्फत चालविण्यात येणारे उद्योग, तसेच छोटे-मोठे व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी अथवा सुरू उद्योगांमध्ये वृद्धी करण्यासाठी केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. सर्वच जाती- धर्मांच्या नागरिकांना या योजनांच्या माध्यमातून ५ ते ६० टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध आहे, तसेच बँकांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित बूथप्रमुख क्रियाशील राहतील. त्यामुळे या याेजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. पाटील यांनी केले आहे.