आरक्षण जाहीर, आता खुर्ची मिळविण्यासाठी धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:33 IST2021-01-23T04:33:21+5:302021-01-23T04:33:21+5:30
लोहारा : लोहारा तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण शुक्रवारी जाहीर करण्यात आले. आरक्षण जाहीर हाेताच इच्छुकांनी खुर्ची मिळविण्यासाठी ...

आरक्षण जाहीर, आता खुर्ची मिळविण्यासाठी धावाधाव
लोहारा : लोहारा तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण शुक्रवारी जाहीर करण्यात आले. आरक्षण जाहीर हाेताच इच्छुकांनी खुर्ची मिळविण्यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. काठावरचे बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीतील सदस्यांना आता सहलीवर पाठविण्यात येऊ लागले आहे.
लाेहारा तहसील कार्यालयात ४४ ग्रामपंचायत सरपंच पदाचे (२०२०-२५) आरक्षण जाहीर करण्यास सकाळी ११ वाजता सुरुवात करण्यात आली. या सोडतीत अनेक ठिकाणी फेरबदल झाले असून, सरपंच पदासाठी बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांचा हिरमोड झाला, तर काहींना अनपेक्षितपणे सरपंचपदाची ‘लाॅट्री’ लागल्याने अशी मंडळी उत्साही हाेती. बहुतांश मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे आरक्षित झाल्याने ग्रामीण भागातील पुढाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. कास्ती (बु.) येथील निवडणूक नुकतीच झाली आहे. या ठिकाणी अनुसूचित जामाती प्रवर्गातील एका जागेसाठी उमेदवारी अर्जच दाखल न झाल्याने ती जागा रिक्त होती. त्यात सरपंचपद अनुसूचित जमाती महिलेसाठी सुटल्याने सरपंचपद रिक्त राहणार आहे. तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींमध्ये २३ ग्रामपंचायत ह्या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. यामध्ये सरपंच पदासाठी अनुसूचित जातीसाठी आठ जागा असून, यातील महिलासाठी चार राखीव आहेत. अनुसूचित जमाती महिलासाठी एक, तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १२ जागा सुटल्या. यापैकी महिलांसाठी सहा राखीव झाल्या आहेत. तसेच २३ ग्रामपंचायतींचे सरपंचपद सर्वसाधारणसाठी आहे. यातील १२ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. आरक्षण साेडतीवेळी पंचायत समितीच्या सभापती हेमलता रणखांब, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, श्याम नारायणकर, सागर पाटील, परवेज तांबोळी, केशव सरवदे, व्यंकट रसाळ, सचिन गोरे, नारायण लोभे, परमेश्वर साळुंके, दादा पाटील, आण्णासाहेब पाटील, सचिन रसाळ, आदी उपस्थित हाेते.
सरपंचपदाचे आरक्षण असे
अनुसूचित जातीसाठी...
आष्टाकासार, हिप्परगा (रवा), धानुरी, उंडरगाव, तर महिलासाठी नागूर, करवंजी, वडगाव गांजा, खेड या ग्रामपंचायती राखीव.
अनुसूचित जमातीसाठी...
कास्ती (बु.) महिलासाठी राखीव
नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी...
भातागळी, मार्डी, नागराळ (लो), भोसगा, कोंडजीगड, बेंडकाळ, तर महिलासाठी अचलेर, करजगाव, राजेगाव, वडगाववाडी, दस्तापूर, दक्षिण जेवळी या ग्रामपंचायती राखीव.
सर्वसाधारणसाठी...
कानेगाव, कास्ती (खुर्द), मुर्शदपूर, मोघा, बेलवाडी, माळेगाव, तोरंबा, विलासपूर पांढरी, तावशीगड, लोहारा (खुर्द), चिंचोली (रेबे), तर महिलांसाठी माकणी, जेवळी, सास्तूर, हराळी, होळी, चिंचोली काटे, सालेगाव, फणेपूर, आरणी, एकोंडी (लो), उदतपूर, सय्यद हिप्परगा या ग्रामपंचायती राखीव आहेत.