कळंब तालुक्यात शनिवारी विक्रमी लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:37 IST2021-09-05T04:37:05+5:302021-09-05T04:37:05+5:30
कळंब : तालुक्यात शनिवारी रेकॉर्डब्रेक चार हजार लसीकरण झाले. एका दिवसात झालेल्या लसीकरणाचा आजवरचा हा उच्चांकी पल्ला आहे. कोरोनाच्या ...

कळंब तालुक्यात शनिवारी विक्रमी लसीकरण
कळंब : तालुक्यात शनिवारी रेकॉर्डब्रेक चार हजार लसीकरण झाले. एका दिवसात झालेल्या लसीकरणाचा आजवरचा हा उच्चांकी पल्ला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात शहर व ग्रामीण अशा दोन स्तरावर लसीकरण कार्यक्रम राबवला जात आहे. यात शहरातील नियोजन उपजिल्हा रुग्णालयाकडे, तर ग्रामीण भागातील नियोजन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे आहे. मागच्या फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेले हे लसीकरण सत्र तालुक्यातील दोन लाखांवर लोकसंख्येच्या तुलनेत म्हणाव्या अशा गतीने नव्हते. यातच तिसऱ्या लाटेची चर्चा वेग घेत असतानाच अचानक तालुक्यातील लसीकरणाचा वेग वाढल्याचे दिसून येत आहे. मागच्या सहा दिवसांपैकी शुक्रवारचा अपवादवगळला तर सोमवार ते शनिवार या काळात चार दिवस लसीकरणाचे ४५ सेशन्स संपन्न झाले असून, यात तब्बल दहा हजार ३४५ लसीचे डोस देण्यात आले आहेत, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जे. एन. सय्यद यांनी सांगितले.
चौकट...
१५ गावांतील उपकेंद्रांवर कॅम्प
तालुक्यात शनिवारी ग्रामीण भागात सहा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या १५ गावांतील आरोग्य उपकेंद्रात लसीकरण कॅम्प ठेवण्यात आले होते. यात तब्बल तीन हजार ६३४ लसींचे डोस देण्यात आले आहेत. याशिवाय उपजिल्हा रुग्णालयाने शहरातील दोन केंद्रांवर ३८७ डोस दिले आहेत. एकूणच एकाच दिवशी तालुक्यात शनिवारी तब्बल चार हजार २१ लसीकरण साध्य झाले आहे. आजवरचा हा विक्रम आहे.
आजवर झालेल्या डोसची संख्या ऐंशी हजार पार
दरम्यान, तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्या एक लाख ८४ हजारांच्या आसपास आहे. एकूण ४५६ सेशन्समध्ये यातील लोकांना ५६ हजार ४२४, तर उपजिल्हा रुग्णालयात २५ हजार ७७० लसींचे डोस देण्यात आले आहेत. कळंब शहरातील डोस घेणाऱ्यांत ग्रामीण भागातील लोकांचाही समावेश आहे. एकूणच आजवर तालुक्यात ८२ हजार लसीचे डोस टोचण्यात आले आहेत.