रेशनच्या धान्यालाही मिळतोय वाढीव दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:38 IST2021-09-14T04:38:59+5:302021-09-14T04:38:59+5:30

उन्मेष पाटील कळंब : कोरोनाकाळात हाताला काम नसल्याने पोटाची आबाळ होऊ नये यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून काही ...

Ration grains are also getting increased rates | रेशनच्या धान्यालाही मिळतोय वाढीव दर

रेशनच्या धान्यालाही मिळतोय वाढीव दर

उन्मेष पाटील

कळंब : कोरोनाकाळात हाताला काम नसल्याने पोटाची आबाळ होऊ नये यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून काही घटकांना मोफत तर काही घटकांना अल्पदरात धान्य उपलब्ध करून दिले. या धान्याचाच आता काही मंडळी काळाबाजार करीत असल्याचे समोर आल्याने शासनाच्या उदात्त हेतूला धक्का पोहोचतो आहे.

कळंब तालुक्यात स्वस्त धान्य दुकानामार्फत ३८ हजार लाभार्थी कुटुंबाना साडेआठ हजार क्विंटल धान्य दरमहा उपलब्ध होते. शेतकरी कुटुंबाना गहू २ रुपये किलो, तर तांदूळ तीन रुपये किलो दराने दिला जातो. अंत्योदय तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना हे धान्य मोफत वितरित केले जाते. कोरोना काळात अनेकांच्या हाताचा रोजगार गेला. कुटुंबाची उपासमार होत असल्याने शासनाने गरीबांनाही पोटभर अन्न मिळावे या हेतूने हे धान्य स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले. मात्र, त्याचाच बाजार काही मंडळींनी मांडल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे.

ग्रामीण भागात गहू व तांदूळ रोजच्या जेवणातील घटक नाहीत. ज्वारीची भाकरी हा आहाराचा भाग आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानामार्फत मिळणारा प्रती माणसी ३ किलो गहू व २ किलो तांदूळ हा काही कुटुंबात अतिरिक्त ठरतो आहे. बाजारात किमान अनुक्रमे २० रुपये व ४० रुपये दर असलेला गहू व तांदूळ त्यामुळेच आता काळ्या बाजारात मोस्ट वॉन्टेड ठरतो आहे. हा गहू -तांदूळ खरेदी करणाऱ्या टोळ्या आता गावोगावी जाऊन गहू ८ ते १०, तर तांदूळ १५ ते २० रुपये प्रतिकिलोने खरेदी करत आहेत. बिस्कीट, पाव, ब्रेड, खारी तसेच पापड्या वगैरे खाद्यपदार्थ बनविणाऱ्या काही स्थानिक कंपन्या या गहू-तांदळाचे ठोक ग्राहक असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे मागील काही महिन्यांत असे पदार्थ बनविणाऱ्या काही नव्या छोट्या कंपन्या मोठ्या प्रमाणात बाजारात आल्याने हा धान्याचा काळा बाजार सध्या तेजीत असल्याचे चित्र दिसत आहे.

चौकट -

गावोगावी फिरतात वाहने

तालुक्यातील काही गावांतील लोकांकडे याबाबत चौकशी केली असता अशी वाहने महिन्यातून एकदा धान्य खरेदीसाठी येतात, अशी माहिती त्यांनी दिली. ज्यांच्या रेशनकार्डवर माणसे जास्त आहेत, पण ते रोजगारासाठी इतर ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत, अशांना मिळणारे गहू-तांदूळ अतिरिक्त होतात. काहींच्या घरात एक कट्टा म्हणजे ५० किलो गहू-तांदूळ दोन महिन्यांला जमा होतात. त्याचे सरासरी हजार रुपये विनासायास मिळतात, अशी माहितीही त्यांनी दिली.

चौकट -

तत्काळ माहिती देण्याचे निर्देश

शासकीय योजनेतील धान्य वापर न करता कोणी विकत असेल तर त्याविरुद्ध नियमानुसार कार्यवाही केली जाईल. हे धान्य विकत घेणारी मंडळी कोठे आढळून आली तर त्याबाबत पोलीस ठाणे तसेच तहसील प्रशासनाला त्वरित कळविण्याचे निर्देशही स्वस्त धान्य दुकानदारांना दिले आहेत. शासकीय धान्याचा कोणत्याही परिस्थितीत रेशन दुकानदार, लाभार्थी किंवा अन्य यांनी गैरवापर केला तर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

- नरेंद्र काळे, प्रभारी नायब तहसीलदार, पुरवठा विभाग, कळंब

Web Title: Ration grains are also getting increased rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.