राम मंदिर निर्माण जनजागृती अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST2021-02-09T04:34:59+5:302021-02-09T04:34:59+5:30
व्यापारी संघटनेची मंगळवारी बैठक उमरगा : उस्मानाबाद जिल्हा व्यापारी संघटनेची बैठक मंगळवारी सायंकाळी सात वाजता येथील चिंचोळे मंगल कार्यालयात ...

राम मंदिर निर्माण जनजागृती अभियान
व्यापारी संघटनेची मंगळवारी बैठक
उमरगा : उस्मानाबाद जिल्हा व्यापारी संघटनेची बैठक मंगळवारी सायंकाळी सात वाजता येथील चिंचोळे मंगल कार्यालयात होणार आहे. महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत उमरगा व्यापारी महासंघाच्या माजी पदाधिकाऱ्यांचा ॠणनिर्देश व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी तहसीलदार संजय पवार, पोलीस निरीक्षक मुकूंद आघाव यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष नितीन होळे यांनी केले आहे.
येडशीत अखंड हरिनाम सप्ताह
येडशी : येथे विघ्नहर्ता गणेश मंदीरात शिवजयंती व गणेश जयंतीनिमित्त ९ ते १९ फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह साजरा होत आहे. यात ह.भ.प. रामाणाचार्य बोधले, चंद्रकांत खळेकर, निलेश महाराज कोरडे, नितीन महाराज जगताप, समाधान महाराज शर्मा, प्रकाश बोधले महाराज, अविनाश भारती महाराज, ऋषिकेश जोशी महाराज, कष्णा राऊत महाराज, गणेश भगत महाराज यांची किर्तनसेवा होणार असल्याचे संयोजकांनी कळविले आहे.
श्रीकृष्ण मंदिराचा वर्धापण दिन साजरा
इंदापूर : वाशी तालुक्यातील इंदापूर येथे ७ फेब्रुवारी रोजी श्रीकृष्ण मंदिराचा प्रथम वर्धापण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी श्रीकृष्ण मूर्तीस मंगल स्नान घालण्यात आले. यानंतर गीता पारायण, प्रवचन, पंच आवतार उपहार, महाआरती व नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी महंत श्रीधर शेवलीकर यांचे प्रवचन झाले. महंत रंगनाथ दादा यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. यावेळी महंत खडकतकर, महंत अवधूतकर बाबा, महंत उद्धव राज, महंत विश्वंभर अप्पा, तपस्वीनी राणीताई शेवलीकर यांच्यासह भाविक उपस्थित होते.
महाविद्यालयात ऑनलाईन ओरिएंटेशन
उस्मानाबाद : डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील आर.पी. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात धनेश्वरी शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बी. फार्मसी प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन ओरिएंटेशन कार्यक्रम पार पडला. यावेळी प्राचार्य डॉ. गाजी शेख, प्राचार्य डॉ.गाजी शेख यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास १७३ विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
वाहनचालकावर गुन्हा दाखल
उस्मानाबाद : गावातील चौकात रहदारीच्या मार्गावर वाहतुकीस अडथळा होईल अशा रितीने वाहन उभे केल्या प्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई ६ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. कसबे तडवळा येथील सुरेश रामा पवार हा ६ फेब्रुवारी रोजी गावातील चौकात एमएच २५/ पी ५८७१ हा रहदारीच्या ठिकाणी वाहतुकीस कोंडी होईल, अशा अवस्थेत उभा केला होता. यावरून त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
बारा मीटर वायर, बॅटरी केली लंपास
उस्मानाबाद : चोरट्यांनी खोलीतून बारा मीटर वायर व एक बॅटरी असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना ५ व ६ फेब्रुवारीच्या रात्री घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील साई इस्पीतळ इमारतीवरील इन्डस टायर कंपनीच्या मनोऱ्याच्या खालील खोलीतून चोरट्यांनी सदरील मुद्देमाल चोरून नेला. पापनाशनगर भागात राहणाऱ्या एका परिचिताने हा माल चोरून नेल्याचा संशय पर्यवेक्षक महादेव ढवण यांनी फिर्यादीत व्यक्त केला असून, यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
उशाला ठेवलेला मोबाईल चोरला
तुळजापूर : घराचा दरवाजा पुढे करून झोपलेल्या इसमाचा उशाला ठेवलेला मोबाईल चोरीस गेल्याची घटना तालुक्यातील सारोळा येथे २१ ते २२ सप्टेंबर २०२० च्या रात्री घडली. संदीप उमाकांत म्हेत्रे हे त्यांच्या घरात दरवाजा पुढे करून झोपले होते. यावेळी अज्ञाताने त्यांच्या उशाला असलेला मोबाईल फोन चोरून नेल्याची फिर्याद म्हेत्रे यांनी दिली. यावरून ६ फेब्रुवारी रोजी तुळजापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
------------------
स्वच्छता मोहीम
(फोटो : मनोज डोलारे ०८)
कळंब : तालुक्यातील शिंगोली येथे 'माझं गाव सुंदर गाव' अभियानास ग्रामस्थांनी गावातील स्वच्छता करून सुरुवात करण्यात आली. यावेळी दौलतराव माने, ग्रामसेवक लाटे साहेब, मुख्याध्यापक म्हेत्रे आदी उपस्थित होते.
सरपंचपदी मुंढे
(फोटो : अरूण देशमुख ०८)
भूम : तांबेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कल्पना पद्माकर मुंढे तर उप सरपंचपदी अभिजीत वसंत महाजन यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सदस्य पुरुषोत्तम बांगर, अभिमान जाधवर, स्वाती सोनवणे आदी उपस्थित होते. निवडीनंतर जल्लोष करण्यात आला.
कोरोना चाचणी
तुळजापूर : येथील जवाहर नवोदय विद्यालयात रविवारी ९७ शिक्षक, कर्मचारी व कुटूंबियांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी प्रयोगशाळा तंत्रज्ञ अभिजीत गायकवाड, महेश अडसुळे यांनी तपासणीची जबाबदारी पार पाडली.
इंदुरीकर यांचा सत्कार
तुळजापूर : हभप िनवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी शुक्रवारी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यानंतर नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी आनंद कंदले, नारायण ननवरे, रत्नदीप भोसले, श्रीनाथ शिंदे उपस्थित होते.
अवैध दारू विक्री
ढोकी : येथील मनिषा अशोक चव्हाण या नऊ लिटर अवैध गावठी दारूसह पोलिसांच्या पथकास ६ फेब्रुवारी रोजी आढळून आल्या. पोलिसांनी मनिषा चव्हाण यांच्य ाताब्यातील गावठी दारू जप्त करून त्यांच्या विरुध्द ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.