लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद - जिल्ह्यात पल्स पाेलिओ लसीकरण माेहीम दिनांक १७ जानेवारी राेजी राबविण्यात येणार हाेती. आराेग्य यंत्रणेनेही संपूर्ण तयारी केली हाेती. मात्र, केंद्र सरकारने ही माेहीम पुढे ढकलली आहे. रविवारी याविषयीचे पत्र आराेग्य विभागाला प्राप्त झाले आहे. संभाव्य काेराेना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
जिल्ह्यात १७ जानेवारी राेजी पल्स पाेलिओ लसीकरण माेहीम राबविण्यात येणार हाेती. त्यानुसार आराेग्य यंत्रणेकडून तयारीही करण्यात आली हाेती. पाेस्टर, बॅनर, कर्मचारी नियुक्ती, लस वितरण आदी बाबी पूर्ण झाल्या हाेत्या. मात्र, असे असतानाच केंद्र सरकारने हे लसीकरण पुढे ढकलले आहे. काही अपरिहार्य कारणामुळे हा निर्णय घेतल्याचे ‘त्या’ पत्रात म्हटले आहे. दरम्यान, केंद्र तसेच राज्य शासनाच्या निर्देशानुसार काेराेना लसीकरणाची जय्यत तयारी आराेग्य यंत्रणेकडून करण्यात आली आहे. ‘ड्राय रन’ही नुकताच यशस्वीरित्या पार पडला. त्यामुळे आराेग्य यंत्रणेचे मनाेबल उंचावले आहे. लसीकरणाचे आदेश कधीही धडकू शकतात, ही बाब लक्षात घेऊन आराेग्य विभागाने सुमारे ८ हजार २७२ अधिकारी, आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यासाठी पाच सेंटर निश्चित केली आहेत. यात कळंब, उमरगा, परंडा, तुळजापूर येथील उपजिल्हा रूग्णालये व उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयाचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर पाेलिओ प्रतिबंधक लसीकरण पुढे ढकलले असावे, अशी चर्चा आहे.
काेट...
केंद्र सरकारचे पत्र रविवारी आले आहे. त्यानुसार पल्स पाेलिओ प्रतिबंधक लसीकरण माेहीम पुढे ढकलली आहे. हा निर्णय कशासाठी घेतला? याबाबतचा उल्लेख पत्रामध्ये नाही. त्यामुळे यावर जास्तीचे भाष्य करणे याेग्य हाेणार नाही.
- डाॅ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा आराेग्य अधिकारी, उस्मानाबाद.