पं. नाथराव नेरळकरांनी तेरखेड्यातून केली उपसवाई गंधर्व महोत्सवाची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:33 IST2021-03-31T04:33:25+5:302021-03-31T04:33:25+5:30

भूम : पंडित नाथराव नेरळकर यांनी मराठवाड्याच्या ग्रामीण भागात शास्त्रीय संगीताची कला जोपासली जावी, यासाठी वाशी तालुक्यातील तेरखेडा ...

Pt. Nathrao Neralkar started the Upaswai Gandharva Festival from Terkheda | पं. नाथराव नेरळकरांनी तेरखेड्यातून केली उपसवाई गंधर्व महोत्सवाची सुरुवात

पं. नाथराव नेरळकरांनी तेरखेड्यातून केली उपसवाई गंधर्व महोत्सवाची सुरुवात

भूम : पंडित नाथराव नेरळकर यांनी मराठवाड्याच्या ग्रामीण भागात शास्त्रीय संगीताची कला जोपासली जावी, यासाठी वाशी तालुक्यातील तेरखेडा हे गाव शास्त्रीय संगीतासाठी दत्तक घेतले. शिवाय, प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील नामवंत गायक, कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करून ते स्वत: या कार्यक्रमाला उपस्थित राहत. तेरखेडा येथे स्व. विलासराव देशपांडे गुरुजी यांच्या स्मरणार्थ रसिकांना शास्त्रीय संगीताची मेजवानी देण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला. पुढे हाच महोत्सव मराठवाड्याचा उपसवाई गंधर्व महोत्सव म्हणून रसिक ओळखू लागले. त्यांच्या निधनाने शास्त्रीय संगीताचा बादशहा हरपला, अशी प्रतिक्रिया तेरखेडा येथील स्व. देशपांडे गुरुजी संगीत समारोह समितीचे प्रमुख संगीत विशारद अंबादास देशपांडे यांनी व्यक्त केली.

ज्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्यात फक्त आणि फक्त संगीताची सेवा केली, त्यांना संगीताचा बादशहा हीच उपमा सार्थ ठरते, असे सांगून देशपांडे म्हणाले, माझा आणि पंडितजींचा संपर्क १९९९ साली आला. माझे काका स्व. विलासराव देशपांडे गुरुजी यांच्या पुण्यस्मरणार्थ तेरखेडा येथे देशपांडे परिवाराच्या वतीने १९९७ ला संगीत महोत्सव सुरू केला होता. पहिल्या वर्षी स्थानिक व परिसरातील कलाकारांचा गायनाचा कार्यक्रम केला. दुसऱ्या वर्षी पं. शिवदास देगलूरकर यांचा कार्यक्रम झाला. १९९९ साली मी औरंगाबादला पंडितजींकडे गेलो. हाॅलमध्ये पं. नाथराव दरबारी कानडा रागाचे सूर आळवित होते. मी ते ऐकत भान विसरून गेलो होतो. रियाज झाल्यावर मी नमस्कार केला व माझा परिचय करून दिला. तेरखेडच्या कार्यक्रमाची माहिती दिली, पण तेरखेडच्या कार्यक्रमाला निमंत्रण द्यायचे धाडस होत नव्हते. कारण, एवढा मोठा कलाकार आणि मला प्रश्न होता बिदागीचा. मात्र, त्यांनीच मला विचारले, मग यावर्षी कोणाला बोलावताहेत? अगदी भीतभीतच बोललो, सर मी त्यासाठीच आपणांकडे आलो आहे. पण, असे बोलून थांबलो. परंतु, ते म्हणाले, बंद पाकिटात तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढीच बिदागी द्या. मी माझ्या स्वत:च्या गाडीने येईन. कार्यक्रमाच्या तयारीला लागा. फक्त साउंड सिस्टिम चांगली ठेवा.

आषाढ वद्य एकादशी १९९९ रोजी पंडितजींची जी मैफल झाली ती आजही स्मरणात आहे. तेरखेडा आणि पंचक्रोशीतील श्रोत्यांची मिळालेली दाद पाहून पंडितजींनी तेरखेडा हे गाव शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी दत्तक घेतले. त्या वर्षीपासून ते स्वत: २०१५ पर्यंत दरवर्षी तेरखेड्याला येत असत. केवळ त्यांच्यामुळे तेरखेड्यासारख्या ग्रामीण भागातील श्रोत्यांना शास्त्रीय संगीत श्रावणाचा लाभ मिळाला. पंडितजींमुळे तेरखेड्याला पं. प्रभाकर कारेकर, आरती अंकलीकर, कल्पना झोकरकर, पं. अजय पोहनकर, तालयोगी पं. सुरेश तळवलकर, पं. श्रीकांत देशपांडे, पं. गणपती भट, पं. जयतीर्थ मेउंडी, हेमा उपासनी, पं. शौनक अभिषेकी, पं. गिरीश गोसावी, पं. कैवल्यकुमार गुरव, पं. रघुनंदन पणशीकर, विदूषी कलापिनी, कोमकली रुचिरा केदार यांसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक व गंगाधर देव, सुरेश फडतरे, हनुमंत फडतरे, दिलीप दोडके, शिवराम गोसावी, जयराम गोसावी, प्रशांत पांडव, जयंत नेरळकर आदी तबला-हार्मोनियम वादक अशा दिग्गज कलाकारांच्या कलेचा आस्वाद घेता आला.

Web Title: Pt. Nathrao Neralkar started the Upaswai Gandharva Festival from Terkheda