पावसाळ्यात फळ बागेचे योग्य नियंत्रण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:33 IST2021-09-11T04:33:32+5:302021-09-11T04:33:32+5:30

परंडा : नव्याने फळबागायती केलेल्या शेतकऱ्यांनी बागेत लक्षपूर्वक नियोजन करणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने रसशोषक किडी व भुरी ...

Properly control the orchard during the rainy season | पावसाळ्यात फळ बागेचे योग्य नियंत्रण करा

पावसाळ्यात फळ बागेचे योग्य नियंत्रण करा

परंडा : नव्याने फळबागायती केलेल्या शेतकऱ्यांनी बागेत लक्षपूर्वक नियोजन करणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने रसशोषक किडी व भुरी रोगांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे फळबागायतीत विशेष लक्ष पुरविण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी महारुद्र मोरे यांनी केले आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांत अतिवृष्टी झाल्याने खरिपाच्या पिकासह फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुका कृषी अधिकारी महारुद्र मोरे नुकसानग्रस्त स्थळाला भेट देऊन पाहणी करीत आहेत. नव्याने उभारण्यात आलेल्या फळबागांना भेटी देत आहेत. कृषी अधिकाऱ्यांची संपूर्ण टीम शेतशिवारात हजेरी लावत आहे. शुक्रवारी तालुक्यातील पिंपरखेड येथील महावीर काशीद यांच्या सीताफळाच्या फळबागेला तालुका कृषी अधिकारी मोरे यांनी भेट देऊन झाडांची पाहणी केली. महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण यावर माहिती देताना मोरे म्हणाले की, पिठ्या ढेकूण, पांढरे ढेकूण, मेण कीडे, किंवा मिलीबग ही कीड पाने, कोवळ्या फांद्या, कळ्या आणि कोवळी फळे यामधून रस शोषण करते. त्यामुळे पानांचा व फळांचा आकार वेडावाकडा होतो. कळ्या व फळे गळतात. अशा सीताफळांना बाजारभाव कमी मिळतो. या किडीचा प्रादुर्भाव पावसाळा व त्यानंतर जास्त आढळतो. या किडीच्या अंगातून स्त्रवणाऱ्या मधासारख्या चिकट पदार्थावर काळी बुरशी चढते. त्यामुळे झाडांची पाने काळी पडून प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते, असे ते म्हणाले. यावेळी कृषी पर्यवेक्षक बिभिषण हांगे, कृषी सहायक गिरीष कुलकर्णी, महावीर काशीद, अनवर लुकडे, मनोज काशीद, आदी उपस्थित होते.

चौकट..

अशा कारव्यात उपाययोजना

कीड रोगावरील नियंत्रणासाठी कीडग्रस्त फांद्या व पाने काढून त्यावर १० टक्के कार्बारिल भुकटी टाकून ती गाडावीत. मिलीबगला खाणारे परभक्षी कीटक क्रिटोलिमस मोन्टोझरी प्रती एकरी ६०० ग्रॅम या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा बागेत झाडावर सायंकाळच्या वेळेत सोडावेत. भुंगेरे सोडल्यानंतर कोणत्याही प्रकारचे कीटकनाशक बागेवर फवारू नये. व्हर्तीशिलीयम लिकॅनी (फुले बगीसाइड) हे जैविक बुरशीनाशक ४० ग्रॅम, ५० ग्रॅम फिश ऑईल रोझिन सेप प्रती १० लिटर पाण्यातून आर्द्रतायुक्त हवामानात फवारावे. मिलीबगला मारक परंतु परभक्षी किटकांना कमी हानिकारक डायक्लोरोव्हॉस किंवा क्लोरोपायरीफॉस २५ मिली., २५ ग्रॅम ऑइलरोझीन सोप, बुप्रोफेझीन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून भुंगेरे सोडण्यापूर्वी फवारणी करण्याचा सल्लादेखील यावेळी मोरे यांनी फळबाग शेतकऱ्यांना दिला.

100921\psx_20210910_130620.jpg

दि  १० शुक्रवार रोजी तालुक्यातील पिंपरखेड येथिल महवीर काशीद यांच्या सिताफळाच्या फळबागेला तालुका कृषी अधिकारी मोरे यांनी भेट देऊन फळबागेची पाहणी केली.

Web Title: Properly control the orchard during the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.