व्यावसायिकांनी चाचण्या करून घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:31 IST2021-03-20T04:31:45+5:302021-03-20T04:31:45+5:30
वाशी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कळंबच्या उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडंट कमांडर अहिल्या गाठाळ यांनी विविध प्रकारच्या उपाययोजना आखल्या असून, ...

व्यावसायिकांनी चाचण्या करून घेण्याचे आवाहन
वाशी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कळंबच्या उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडंट कमांडर अहिल्या गाठाळ यांनी विविध प्रकारच्या उपाययोजना आखल्या असून, शहरातील विविध व्यावसायिकांच्या कोरोनाच्या चाचण्या येत्या आठवडाभरात करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे, तसेच तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सरमकुंडी फाट्यावरील हॉटेल्स, रेस्टाॅरंट बंद ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
तालुक्यात कोरोनाचा शिरकाव वाढू लागला असून, १२ मार्चपासून ४० रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ६ रुग्ण जिल्हा रुग्णालयात, ३२ रुग्ण वाशी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये, तर दोन रुग्ण घरी उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांच्या आदेशानुसार तहसीलदारांनी शहरातील व्यावसायिकांनी कोरोनाच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन केले आहे. सदरील रुग्ण हे वाशी, तेरखेडा, सारोळा-मांडवा, पारगाव,वडजी, नांदगाव, पिंपळवाडी येथील आहेत़
चौकट......
असे आहे वेळापत्रक
बेकरी, हॉटेल्स, लॉजेस, बीअरबार यांच्यासाठी २२ मार्च रोजी तपासणी ठेवण्यात आली आहे. केशकर्तनालय २३ मार्च, सराफा दुकानदार २४ मार्च, गॅरेज, ऑटोमोबाइल्स दुकाने २५ मार्च, औषधी दुकाने २६ मार्च, किराणा दुकाने २७ मार्च, जनरल स्टोअर्स व इतर दुकाने २८ मार्च, भाजी व फळविक्रेते २९ मार्च, कृषी संबंधित दुकाने ३० मार्च, तर कापड दुकानदारांसह तेथील कर्मचाऱ्यांची तपासणी ३१ मार्च रोजी केली जाणार आहे. तपासणी न केल्यास योग्य ती कारवाही करण्याचा इशाराही देण्यात आला आहे़