मिरचीचा हाती पडलेला ‘दाम’ शेतकऱ्यास फुटला घाम...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:33 IST2021-03-18T04:33:15+5:302021-03-18T04:33:15+5:30
कळंब : मोठ्या कष्टाने पिकविलेली हिरवी मिरची त्यांनी भल्या पहाटे कळंबला पोहोचविली. दुपारी पट्टी घेण्यासाठी व्यापाऱ्याचे दार गाठले. यावेळी ...

मिरचीचा हाती पडलेला ‘दाम’ शेतकऱ्यास फुटला घाम...
कळंब : मोठ्या कष्टाने पिकविलेली हिरवी मिरची त्यांनी भल्या पहाटे कळंबला पोहोचविली. दुपारी पट्टी घेण्यासाठी व्यापाऱ्याचे दार गाठले. यावेळी हाती आलेला ‘दाम’ पाहून मात्र ‘घाम’ फुटला. कारण शंभर किलोवर मिरचीचे केवळ २३४ रुपये हातात पडले होते. बाजारात मात्र मिरची तीस ते चाळीस रुपयांनी विकली जात होती.
वाशी तालुक्यातील पारा येथील सूर्यकांत पांचाळ या तरुणाने एक एकर मिरचीचे पीक घेतले आहे. यापैकी दुसऱ्या तोडणीचे पीक त्यांनी एका खाजगी वाहनात बुधवारी भल्या पहाटे कळंब येथील ‘त्या’ तथाकथित ‘बीट’ मार्केटला पाठविले.
यानंतर दुपारच्या सुमारास त्या मालाची पट्टी घेण्यासाठी पांचाळ यांनी कळंब गाठले. त्याठिकाणी माल काढला आहे, असे पांचाळ यांना सांगण्यात आले. तद्नंतर पट्टी पाहिली असता मात्र पांचाळ यांना घामच आला.
कारण कष्टाने पिकविलेल्या जवळपास १२० किलो मिरचीची एकूण पट्टी ३४६ रुपये होती. यात ५६ रुपये खर्च कपात करून देय रक्कम २९० रुपये होती. यानंतर बाजारात तीस ते चाळीस रुपयाला आजच्या भावात जात असलेली मिरची तीन रुपयाने घेतल्याने पांचाळ हताश झाले. संताप व्यक्त करूनही समोरून दाद मिळत नसल्याने आपल्यावर झालेल्या अन्यायाची कैफियत मांडण्यासाठी मग बाजार समिती गाठली.
त्यांनी याठिकाणी ‘नरोवा कुंजरोवा’ची भूमिका घेतली. मग गाठले उपविभागीय अधिकारी कार्यालय. तेथे आपल्यावरील आपबिती कथन केली. त्यांना लेखी निवेदन दिले.
लोकप्रतिनिधी, नेत्यांशी संवाद साधला; परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही.
चाैकट...
एकूणच बीटला मिळालेल्या दराच्या दहापट दर बाजारात असताना आपल्या मालाला मिळालेले अल्पमोल पांचाळ सगळ्यांना सांगत होते. मात्र, कोठेही ठोस आधार मिळाला नाही.
शेवटी इतर शेतकऱ्यांप्रमाणेच सूर्यकांत पांचाळ यांच्याही पदरी आलेला कृषी पणन व्यवस्थेचा हा प्रकार पुन्हा एकदा ‘दाद न फिर्याद’ ठरल्याने हताश होत घरचा रस्ता धरावा लागला. अशा प्रकरणाचा दाखला घेत तरी जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या मार्केट कमिटीने तरकारी, फळपिकांची खरेदी करावी असा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.